नाशिकच्या इतिहासात अजुन एक मानाचा तुरा पंचाळे गावचे सुपुत्र त्रंबक खंडू फटांगरे यांची भारतीय सैन्यात लेफ्टीनेंट पदी निवड
नाशिकच्या इतिहासात अजुन एक मानाचा तुरा
पंचाळे गावचे सुपुत्र त्रंबक खंडू फटांगरे यांची भारतीय सैन्यात लेफ्टीनेंट पदी निवड
इगतपुरी / लक्ष्मण सोनवणे
देशसेवेचा वारसा असलेल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावचे सुपुत्र त्रंबक खंडू फटांगरे यांची भारतीय सैन्यात लेफ्टीनेंट पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्रंबक फटांगरे यांनी भारतीय सैन्यात युध्दात अव्वल मानल्या जाणाऱ्या मराठा बटालियन मध्ये तब्बल 28 वर्ष देशसेवेचा खडतर प्रवास केल्यानंतर त्यांना हे पद मिळाले आहे. अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी दोन वेळेस जम्मु काश्मीर, जामनगर (गुजरात), सिक्कीम, चंडीगढ, हिमाचल प्रदेश,पुणे, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणी आपली सैन्य सेवा करून मोठे योगदान दिले आहे. ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम अशा एक ना अनेक पराक्रमाची यशोगाथा निर्माण करणारे वीर सुपुत्र यांना मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. देश सेवेचा वारसा असलेल्या ह्या सिन्नर च्या फटांगरे कुटुंबीयांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. त्यांच्या धर्मपत्नी वनिताताई फटांगरे यांनी आपल्या पतीच्या देश सेवेत त्यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ अतिशय चांगल्या प्रकारे करून त्यांना देशाचे जबाबदार व देशभक्त नागरिक बनवले आहे. त्यांचा मोठा मुलगा सुदर्शन याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेमेंट रिसर्च कॉलेज जयपूर मधुन एमबीएची डिग्री पुर्ण केली असून तो सध्या मुंबई येथील ग्लेनमार्क कंपनीत कार्यरत आहे. छोटा मुलगा आकाश हा बीसीए करून पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारी करतो आहे. वनिता ताई ह्या देखील
समाजकार्यात अग्रेसर आहेत पतीच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेसाठी प्रयत्नशील असतात. जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातुन शहीद परिवारांना आधार देण्याचं काम त्या नाशिकमध्ये करीत आहेत. सिन्नरच्या या कुटुंबाने देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले त्यांना मानाचा मुजरा !
– भारतीय सैन्यात ऑर्डीनरी लेफ्टीनेंट पदापर्यंत मजल मारणे ही खुप अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला फटांगरे कुटुंबीयांचा अभीमान आहे. देशासाठी त्यांचा त्याग, बलिदान, समर्पण अतिशय कौतुकास्पद आहे. प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक तर्फे त्यांचे खुप खुप अभिनंदन.
विजय कातोरे, जिल्हाध्यक्ष प्रहार सैनिक कल्याण संघ