क्रीडा क्षेत्रात तरूणांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध* डी गंगाधरण जिल्हाधिकारी .
*क्रीडा क्षेत्रात तरूणांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध*
*: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.*
*नाशिक, दिनांक 30 डिसेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) :*
विद्यार्थ्यांसोबतच तरुणपिढीकरिता करिअर विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. क्रीडा क्षेत्रसुद्धा त्यात मागे नसून त्यामध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टिने मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुल येथे राज्यशासन व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. या कार्यक्रमास क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, अविनाश खैरनार, श्रद्धा नालमवार, राजू शिंदे, विरेंद्र सिंग, हेमंत पाटील, राजेंद्र निमबळाते यांच्यासह खेळाडू, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, क्रीडा क्षेत्रात शिस्त व मेहनतीला महत्व असल्याने मनात जिद्द व चिकाटी असेल तर क्रीडा क्षेत्रात उज्वल भविष्य घडविता येते. त्यासाठी आयुष्यात आवडत्या खेळाला सुरूवात करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते. त्यामुळे खेळांच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक स्वाथ्य टिकवण्यास मदत होते. महाराष्ट्र ऑलिंपिक राज्य क्रीडा स्पर्धा 2022 च्या निमित्ताने आपल्या राज्याला 22 वर्षांनंतर पुन्हा मिनी ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची संधी मिळाली असल्याने या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडुनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी सांगितले.
यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या खेळाडुंकडे क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा ज्योत रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. विभागीय क्रीडा संकुल येथून निघालेली क्रीडा ज्योत रॅली जुना आडगाव नाका-पंचवटी कारंजा- रविवार कारंजा – यशवंत व्यायामशाळा – मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – के टी एच एम कॉलेज, गंगापूर रोड – जुना गंगापूर नाका सिग्नल – कॅनडा कॉर्नर – राजीव गांधी भवन – टिळकवाडी मार्गे – गोल्फ क्लब मैदान (हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान) येथे पोहचली. त्याठिकाणी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते रॅलीत सहभागी झालेल्या खेळाडुंचे सत्कार करण्यात येवून क्रीडा ज्योत पुणे येथे होणाऱ्या मुख्य महाराष्ट्र ऑलिंपिक राज्य क्रीडा स्पर्धा 2022 साठी रवाना झाली. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या कविता राऊत, क्रीडा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.