आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यात 10 जुलै पासून दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करावे* *: पालकमंत्री दादाजी भुसे*

*जिल्ह्यात 10 जुलै पासून दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करावे*
*: पालकमंत्री दादाजी भुसे*

*नाशिक, दिनांक : 30 जून, 2023 नाशिक जनमत   वृत्तसेवा):*
दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारच्या सहायक उपकरण वाटप योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्हा समाज कल्याण विभाग व केंद्र सरकारच्या एलिम्को (ALIMCO) या संस्थेमार्फत जिल्ह्यात 10 जुलै पासून तालुकानिहाय दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दिव्यांग व्यक्तींना ADIP (Assistance to Disabled Persons for Purchase/Fitting of Aids and Appliances) या योजने अंतर्गत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, एलिम्को संस्थेचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. सेनगुप्ता यांच्यासह संबधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमाचा एक भाग म्हणून या दिव्यांग तपासणी शिबिरांचे तालुकानिहाय आयोजन करून ते 10 जुलै ते 31 जुलै 2023 अखेर पूर्ण करण्यात यावे. जेणेकरून या शिबिरांमध्ये तपासणी केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणारे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल. त्याअनुषंगाने कोणत्या तालुक्यात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, त्याबाबतचे नियोजन करून तालुकानिहाय तारखा कळविण्यात याव्यात. जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना या शिबिरांच्या माध्यमातून लाभ होण्यासाठी या तपासणी शिबिरांची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरांच्या आयोजनासाठी गट विकास अधिकारी हे तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून काम करतील. या दिव्यांग तपासणी शिबिरासाठी लाभार्थ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व लाभार्थ्यांचे छायाचित्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत, त्यांना शक्यतो त्याच शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचसोबतच ज्या लाभार्थ्यांकडे उत्पन्नाचा दाखला नाही त्यांना महसूल यंत्रणेमार्फत त्याच शिबिरात उत्पन्नाचा दाखला देखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तिंना शिबीरांच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, जेवण या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहे.

याबैठकीत केंद्र सरकारच्या ADIP या योजनेच्या लाभासाठी घेण्यात येणाऱ्या तपासणी शिबिरांच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना लाभासाठी आवश्यक असणारे दाखले व कागदपत्रांबाबत एलिम्को संस्थेचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. सेनगुप्ता यांनी माहिती दिली.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे