शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचे अर्ज 31 जुलै पर्यंत डाक कार्यालयात सादर करावे. मोहन अहिरराव.
दिनांक: 26 जुलै, 2022
*शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज*
*31 जुलै पर्यंत डाक कार्यालयात सादर करावेत*
*-मोहन अहिरराव*
*नाशिक: दिनांक 26 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
खरीप पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योनजेचे अर्ज सर्व डाक कार्यालयात जमा करण्याचा निर्णय डाक विभागामार्फत घेण्यात आला आहे. 31 जुलै, 2022 पर्यंत शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज डाक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आहलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे भूस्खलन, गारपीट, पूर, दुष्काळ आपत्ती, कीटकांच्या प्रार्दूभावामुळे होणारे पिकांचे नुकसान या बाबींसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. यासोबतच चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे पीक काढणीनंतर होणारे नुकसानाची पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत भरपाई मिळविण्यासाठी पीडीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटानंतर 72 तासांच्या आत नुकसान झाल्याचे कळविणे आवश्यक आहे.
नाशिक विभागातील सर्वच डाक कार्यालयात पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.