विमुक्त व भटक्या जाती जमाती महामंडळ गरजूंनी घ्यावा विविध कर्ज योजनेचा लाभ. आधार ताजणे.
दिनांक: 20 मे, 2022
*विमुक्त व भटक्या जाती-जमाती महामंडळ; गरजूंनी घ्यावा विविध कर्ज योजनांचा लाभ*
*:आधार ताजणे*
*नाशिक, दिनांक 20 मे, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग जमातीतील गरजू लोकांसाठी बीज भांडवल कर्ज, थेट कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गटकर्ज व्याज परतावा या योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा जिल्ह्यातील विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्ह्यातील कार्यालयास 2022-23 या वर्षाकरीता बीजभांडवल कर्ज योजनेसाठी 75, थेट कर्ज योजनेकरीता 150, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता (IR-I) 100 आणि गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) 5 कर्ज प्रकरणे असे भौतिक उद्दिष्टे देण्यात आलेले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी खालीप्रमाणे दिलेल्या कागदपत्रांची पुर्तता करून विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बी.विंग, दुसरा मजला, नासार्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड, नाशिक-422011 तसेच कार्यालयाच्या (0253-2236051) दूरध्वनीवर संपर्क साधवा, असेही जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*1) बीजभांडवल कर्ज योजना (25 टक्के)*
▪️ ही योजना राष्ट्रीयकृत बँका जिल्हा, अग्रणी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून राबविण्यात येते.
▪️ महामंडळाचा सहभाग 25 टक्के व बँक सहभाग 75 टक्के असतो.
▪️ या योजनेसाठी महत्तम प्रकल्प मर्यादा रूपये 5 लाख आहे.
▪️ महामंडळाच्या कर्जावरील व्याजदर 4 टक्के असून परतफेड कालावधी 5 वर्षापर्यंत आहे.
▪️ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 1 लाख मर्यादेत असावे.
*2) थेट कर्ज योजना (1 लाख रूपये)*
▪️ अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे.
▪️ अर्जदाराचे कौंटुबिक वार्षिक उत्पन्न शहरी व ग्रामीण भागासाठी 1 लाख रूपये
▪️ नियमीत 2085/- या प्रमाणे 48 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही.
▪️ परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर दसाल दरशेकडा 4% व्याजदर आकारण्यात येईल.
*3) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (10 लाख रूपये)*
▪️ अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
▪️महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील व इतरमागास प्रवर्गातील गरजु व कुशल व्यक्तींना कृषी सलग्न पारंपारीक उदयोग उपक्रम, लघुउद्योग व मध्यम उद्योग उत्पादन व व्यापार विक्री सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायाकरीता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करुन देणे.
▪️वेब पोर्टलवर /(www.vjnt.in) / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
▪️ बँकेमार्फत लाभार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल.
▪️ लाभार्थ्यांना ऑनलाईन पोर्टलवर उद्योगसुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
▪️कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रूपया पर्यंत व परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.
*4) गट कर्ज व्याज परतावा योजना (10 ते 50 लाख रूपये)*
▪️ उमेदवारांचे बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, तसेच बँक मार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुस महामंडळाकडुन अदा केला जाईल.
▪️ गटातील लाभार्थ्यांचे किमान वय 18 ते 45 वर्षे असावे.
▪️ गटातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयापर्यंत असावे.
▪️ गटाने वेळोवेळी कर्ज हप्ते भरल्यास जास्तीत जास्त 12 % पर्यंत मर्यादेत व्याज परतावा त्यांच्या आधारलिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल.
▪️ वेब पोर्टलवर / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर www.vjnt.in नांव नोंदणी अनिवार्य आहे.
*अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
१. जातीचा दाखला
२. उत्पन्नाचा दाखला
३. रेशन कार्ड / रहिवासी दाखला
४. आधार कार्ड / पॅनकार्ड
५. व्यवसाय स्थळाचा पुरावा भाडेपावती करारनामा ७/१२ चा उतारा.
६. जन्मतारखेचा दाखला / शाळेचा दाखला
७. तांत्रिक व्यवसायासाठी आवश्यक असतील असे परवाने/ लायसन्स
८. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चामाल यंत्रसमुग्री आदी चे दरपत्रक सादर करणे आवश्यक आहे.