अभियंत्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर वैज्ञानिक उपाय शोधावेत : विवेक सावंत* ———————————————- *केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘इंडक्शन प्रोग्राम’*

*अभियंत्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर वैज्ञानिक उपाय शोधावेत : विवेक सावंत*
———————————————-
*केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘इंडक्शन प्रोग्राम’*
———————————————-
*नाशिक :जन्मत * यशस्वी अभियंता होण्यासाठी स्पष्ट ध्येय, जिज्ञासा, सातत्य, निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. अभियंत्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनातील समस्या समजून घेऊन त्यावर वैज्ञानिक आणि तांत्रिक उपाय शोधले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व तंत्रज्ञानतज्ज्ञ तथा एमकेसीएलचे सहसंस्थापक विवेक सावंत यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम’ व विशेष पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणतीही प्रणाली किंवा तंत्रज्ञान पूर्णतः परिपूर्ण नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी Optimization, Innovation आणि Continuous Improvement या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय विकसित करावी. तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्हावा, असा सल्लाही सावंत यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी अभियांत्रिकीतील चार वर्षांचा योग्य उपयोग करून Artificial Intelligence (AI) सह वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील ही चार वर्षे तुमच्या आयुष्यातील पुढील चाळीस वर्षांची दिशा ठरवणारी आहेत, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नवप्रवेशित विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————
*कोट*
*विद्यार्थ्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण करावी : ॲड. नितीन ठाकरे*
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता नवकल्पना, कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगारक्षमतेच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी.

विद्यार्थ्यांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत महाविद्यालय, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात करून उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
———————————
*नाशिक : केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम’ व विशेष पालक मेळाव्यात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व तंत्रज्ञानतज्ज्ञ तथा एमकेसीएलचे सहसंस्थापक विवेक सावंत यांचे स्वागत करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे आदी मान्यवर व प्राध्यापकवृंद.*



