भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पेठ-दिंडोरीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
NDRF पथकाकडून जनजागृतीसह प्रात्यक्षिके;* *आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांना मार्गदर्शन*

*भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पेठ-दिंडोरीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
*NDRF पथकाकडून जनजागृतीसह प्रात्यक्षिके;*
*आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांना मार्गदर्शन*
नाशिक,जन्मत दि. १ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : पेठ व दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
पेठ तालुक्यातील इनामबारी येथे आज सकाळी NDRF पथकाने भूकंपाच्या काळात घ्यावयाची काळजी, सुरक्षित स्थळी जाण्याच्या पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी पथकाकडून विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये बचावकार्य कसे करावे, याची प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली. यावेळी पेठ तहसीलदार शिवाजी गवळी व कार्यालयातील कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच, दिंडोरी तहसील कार्यालय येथे दुपारी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात भूकंप, आग, पूर तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत NDRF पथकाने सविस्तर माहिती दिली. आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी शांतता राखणे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आणि आपत्तीनंतर बचाव व मदतकार्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. श्रीमती चैताली दराडे, मंडळ अधिकारी तलाठी व कार्यालयातील इतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करता येत नसली, तरी पूर्वतयारी, योग्य प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून संभाव्य जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.

पेठ व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.




