नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

नाशिक जन्मत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय क्रीडा दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे हॉकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, क्रीडा अधिकारी मंजुषा पगार, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,रमेश पागे, नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशन अध्यक्ष अमित घुगे,रॉयल रायडर अध्यक्ष डॉ.आबा पाटील, सॅटर्डे संडे अध्यक्ष तृप्ती काटकर तसेच सदस्य आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*क्रीडा क्षेत्रातील सत्कार*
क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
१)ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ यामध्ये १०० मीटर स्पर्धेत पुरुष गटात सुवर्णपदक विजेते दिलीप गावित यांचा सत्कार त्यांचे कोच वैजनाथ काळे यांनी स्वीकारला.
२)अथलेटिक्स कोच वैजनाथ काळे
३)अर्जुन पुरस्कार २०२६ चे मानकरी,चेस ग्रँडमास्टर, एशियन गेम्स रौप्य पदक विजेते,भारतातील पहिले एफ आय डी इ ग्रँड स्विस २०२३ चे पुरस्कार विजेते विदित गुजराती यांचा सत्कार त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी हा सत्कार स्वीकारला. ४)नाशिक महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व जलतरण स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नुकत्याच पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या भाग्यश्री तांबोळी
५)नाशिक महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात कार्यरत कर्मचारी व मैदानी स्पर्धा सायक्लोन मध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झालेले तसेच नुकत्याच पार पडलेल्या त्र्यंबक – पैने – नासिक या स्टोन रिज व्हॅली मॅरेथॉन ऑगस्ट २०२६ या २२ किलोमीटर धावणे स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवून निखिल परदेशी याने मनपाचा नावलौकिक वाढवला आहे.

या सर्वांचा सत्कार मनपाच्या वतीने क्रीडा दिनानिमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर विलास शिंदे, यांचे हस्ते व उपायुक्त नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, क्रीडा अधिकारी मंजुषा पगार, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,सोमनाथ कासार, बळवंत कवडे व मान्यवर यांचे उपस्थितीत स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला.
*सायकल रॅलीचे आयोजन*
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीस महापौर हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचे हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. यावेळी उपायुक्त नितीन नेर,पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, क्रीडा अधिकारी मंजुषा पगार, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशन अध्यक्ष अमित घुगे,रॉयल रायडर अध्यक्ष डॉ.आबा पाटील, सॅटर्डे संडे अध्यक्ष तृप्ती काटकर तसेच सदस्य आदी उपस्थित होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून सुरू झालेली सायकल रॅली सीबीएस, गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल,जेहान सर्कल, मॅरेथॉन चौक,अशोक स्तंभ, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएस मार्गे पुन्हा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे समारोप झाला.
नागरिकांमध्ये तसेच तरुण पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, सायकलचा वापर वाढविणे तसेच खेळ व शारीरिक तंदुरुस्तीबाबत प्रोत्साहन निर्माण करणे, या उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडा विभागातील कर्मचारी सोमनाथ कासार बळवंत कवडे यांनी परिश्रम घेतले.
*आजच्या जीवनशैलीत खेळाला महत्त्व – महापौर*
आजच्या जीवनशैलीत खेळाला महत्त्व असून जीवनाच्या जडणघडणीत स्वतःसाठी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे,क्रीडा क्षेत्रात सातत्य ठेवणे हे प्रत्येकाच्या आरोग्यास हितकारक ठरणार आहे. पुढच्या पिढीला आपल्या सायकल असोसिएशनच्या माध्यमातून चांगला संदेश दिला जातो हे आपले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केले.
*नाशिकचे सायकलिस्ट ही मोठी ओळख – उपमहापौर*
नाशिकच्या सायकलिस्ट यांनी त्यांच्या माध्यमातून एक मोठी ओळख निर्माण केलेली आहे आपल्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रमाच्या माध्यमातून सुदृढ व्यक्ती होण्यासाठी एक वेगळा आदर्श या माध्यमातून घालून दिला जात असून त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.



