डेंग्यू-मलेरियाला रोखण्यासाठी १० सप्टेंबरपासून पुन्हा घराघरांत सर्वेक्षण

डेंग्यू-मलेरियाला रोखण्यासाठी १० सप्टेंबरपासून पुन्हा घराघरांत सर्वेक्षण
२० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम; आयुक्त मनिषा खत्री यांनी आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
डेंग्यू व स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी राजीव गांधी भवन येथे आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतरझाकीर हुसेन रुग्णालयास पाहणी दौरा करून डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या परिस्थितीचा तसेच रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुविधा, रुग्णांसाठीची व्यवस्था, औषधसाठा तसेच स्वाइन फ्लूसाठी करण्यात आलेल्या विलगीकरण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी व्यापक उपाययोजना
डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष पंधरवडा राबविण्यात आला. या मोहिमेदरम्यान सुमारे 300 पथकांच्या माध्यमातून 1 लाख 71 हजार घरांचे घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणादरम्यान घरांमध्ये तसेच परिसरात डासांची उत्पत्ती होऊ शकणारी ठिकाणे तपासण्यात आली. कंटेनर, टायर्स, भांडी तसेच इतर वस्तूंमध्ये साचलेले पाणी काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी धूरफवारणी, औषध फवारणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 51 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट महिन्यात डेंग्यूची नोंद झालेली संख्या सर्वात कमी आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने सुरू आहेत.
आगामी काळातील उपाययोजना
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव पुढील काळात वाढू नये यासाठी 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुन्हा विशेष घराघरांत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र व्यवस्था
यावर्षी शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतरही स्वाइन फ्लूचा अहवाल सकारात्मक आलेल्या नागरिकांना आवश्यक औषधे नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी आवश्यकतेनुसार या सुविधांचा लाभ घ्यावा.
नागरिकांनीही घ्यावी खबरदारी


डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात कुठेही पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे. टायर्स, कंटेनर, भांडी, कुंड्या किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू, मलेरिया किंवा स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
पाहणीवेळी प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, प्रभारी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, निवासी डॉक्टर डॉ. शिल्पा काळे, डॉ. हरगीतसिंग कथुरिया तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश यांच्याशी चर्चा करून आयुक्तांनी आढावा घेतला.



