प्रभागाची आई प्रमाणे सेवा करू प्रभाग एकच्या भाजपा उमेदवारांचा मतदारांना शब्द
प्रभागाची आई प्रमाणे सेवा करू
प्रभाग एकच्या भाजपा उमेदवारांचा मतदारांना शब्द
नासिक जनमत प्रतिनिधी

पंचवटी परिसरातील प्रभाग एकमध्ये सुरू असलेली विकासाची गंगा पुढे अशीच अविरत सुरू राहणार असून प्रभागातील पेठ रोड येथे सुरू असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमचे काम, प्रभागात उभारण्यात आलेली सातशेहून अधिक आसन व्यवस्था असलेली भव्य तीन मजली ई लर्निंग अभ्यासिका, क्रिकेट टर्फ, जलकुंभ, नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, उद्यानांची केलेली निर्मिती, कॉलनी रस्त्यांचे केलेले रुंदीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरण या केलेल्या विकासकामांनंतर आता मूलभूत आणि मोठ्या विकासकामांकडे लक्ष केंद्रित करणार असून प्रभागाची आई प्रमाणे सेवा करू असा शब्द प्रभाग एकच्या भाजपा उमेदवारांनी मतदारांना दिला आहे.

प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक सुस्पष्ट आणि आश्वासक ‘व्हिजन’ तयार करण्यात आले असून केवळ आश्वासनं न देता, प्रत्यक्ष कृतीतून विकास साधण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी केला आहे. यात महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, महिलांसाठी स्वतंत्र जिम व योगा केंद्र, प्रभागात ई-सेवा केंद्र सुरू करणार आहे.

प्रभागात काही प्रमाणात असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आणखी नवीन जलकुंभांची निर्मिती करून मोठ्या व्यासाच्या नवीन पाईपलाईन टाकून आधुनिक ‘पंपिंग स्टेशन’ची निर्मिती केली जाईल. यामुळे प्रभागातील पाण्याच्या टाक्यांना मुबलक पाणी पुरवठा होईल तसेच उच्च दाबाने संपूर्ण प्रभागात पुरेसा पाणी पुरवठा होईल. महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करून मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजन केले जाईल. तसेच इनडोअर – आउटडोअर क्रीडा संकुल आणि क्रिकेट प्रेमींसाठी आधुनिक क्रिकेट टर्फ उभारले जातील. नागरिकांच्या आरोग्यासाठी ठिकठिकाणी ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक आणि सुरक्षित फुटपाथची निर्मिती केली जाईल. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी अत्याधुनिक आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येईल.
हरित प्रभागासाठी पर्यावरण आणि सौंदर्यीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून प्रभाग हरित प्रभागाची निर्मिती केली जाईल. मुलांसाठी सुरक्षित बाल उद्याने आणि प्रभागातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण व वाहतूक बेटांची निर्मिती केले जाईल. प्रभागातील धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी प्रशस्त सभामंडप उभारले जातील. असा शब्द भाजपाचे उमेदवार रूपाली स्वप्निल ननावरे, रंजना पोपट भानसी, दिपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार व माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिला आहे.
चौकट
केवळ आश्वासनं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून विकास
यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सरकार असतांना प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून आरोग्य विज्ञान विद्यापीठाची याच प्रभागात स्थापना करण्यात आली होती. याच धर्तीवर आणखी काही प्रकल्प प्रभागालगत आणण्याचा मानस असून महिलांसाठी स्वतंत्र जिम, जलतरण तलाव, इनडोअर – आउटडोअर क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.



