क्रिडा व मनोरंजन

चापडगाव येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ

नाशिक जनमत प्रशांत काकड  यांच्याकडून चापडगाव ता. सिन्नर येथे गुरुप्रतिपदेच्या शुभमोहर्तावर श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व बालसंस्कार केंद्राचा शुभारंभ होत आहे. अतिशय आनंदमय वातावरणात होत असलेल्या या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांचा सहभाग तालुक्यातील सर्वच स्वामी समर्थ केंद्राना प्रेरणादायी असा आहे.

 

स्वामी समर्थ केंद्र आपल्या गावात का सुरु होतेय ? मला, गावाला याचा उपयोग, फायदा काय ? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल व ते साहजिकच आहे.

 

जिथे विज्ञान संपते तिथून आध्यात्म सुरु होते. स्वामी समर्थ मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे. प. पु. मोरेदादा सांगतात, “जो करेल सेवा, तो खाईल मेवा “. या स्वामी मार्गात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत उपचार व तुमच्या – आमच्या दैनंदिन समस्यावर उपाय आहेत. परंतु मी तुम्हाला ते समजावून सांगणार नाहीये. ती अनुभूती तुम्ही केंद्रातील आरती, सेवा, पारायण वैगरे करून घ्यालच. मी तुम्हाला यापलीकडील स्वामी केंद्राचे, आध्यात्माचे साईड इफेक्ट सांगणार आहे. हे स्वामी केंद्र तुमच्या गावात का गरजेचे आहे ? किंवा आध्यात्माचे अधिष्ठान तुमच्या – आमच्या जीवनात का गरजेचे बनलेले आहे.

वाईन ? हा शब्द अलीकडे प्रत्येकाच्या ऐकण्यात आला आहे. कदाचित उद्या ही ” वाईन ” किराणा दुकानात मिळेल… ती किराणा दुकानात मिळणारी वाईन कधी आमच्या घराच्या बैठक हॉल पर्यंत पोहचेल हे आम्हाला समजणारही नाही. ती वाईन कधी आमच्या घरात स्थान पटकावेल हे आमच्या लक्षातही येणार नाही. वाईनचा प्रवास नंतर बिअर, मांसाहार व दारूपर्यंत पोहचला तर…. व्यसनाधिंतेचे प्रचंड दुष्परिणाम समाजात, गावात आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवत असतो. मला तुम्ही सांगा, गावातील एखादा व्यसनी व्यक्ती समृद्ध आहे का ? समृद्ध म्हणजे विचाराने, आचाराने, ज्ञानाने, मानाने, कर्तृत्वाने, प्रतिष्ठने, कौटुंबिक सौख्याने, आरोग्याने, संपत्तीने….. जर गावात असा एखादा व्यक्ती असेल तर नक्की मला सांगा आपण त्यांचा सन्मान करु… याउलट निर्व्यसनी माणूस घ्या तो नक्कीच समृद्ध आयुष्य जगतो. एक व्यसनाधीन व्यक्ती जर दिवसाला 100 रुपये व्यसनात खर्च करत असेल तर एक वर्षात 36500 हजार रुपये, दहा वर्षात तब्बल 3 लाख 65000 हजार रुपये नुसत्या व्यसनात खर्च करत असतो. आणि लाखभर रुपयांच्या सोसायटी किंवा पतसंस्थेच्या कर्जापोटी आपल्या गळ्याला फास लावून झाडाला लटकत असतो. व्यसनाधीन व्यक्ती जितका खर्च व्यसनावर करतो तितके तर त्याच्या डोक्यावर कर्जही नसते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपल्या गावात हे स्वामी समर्थ केंद्र आहे. आपले जीवन समृद्ध असावे म्हणून आपल्याला आध्यात्मिक अधिष्ठान गरजेचे आहे.

 

संवेदनशीलता… कोविड मध्ये आपल्या जिवंत आईला स्मशानभूमीत नेऊन सोडणारा मुलाची बातमी ऐकली. कित्येक कमनशिबी मुले कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या आपल्याच बापाच्या चितेला अग्नी देण्याचे औदार्य दाखवू शकले नाही, हे असंवेदनशीलतेचे प्रतिकच नव्हे काय ? समाजात एका बाजूला संवेदनशीलता कमी होत चालली आहे म्हणूनच दुसऱ्या बाजूला वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागात एकोप्याने, गुण्यागोविंदाने नांदणारी एकत्र कुटुंब व्यवस्था आज खिळखिळी होऊन मृतअवस्थेप्रत आली आहे हे संवेदनक्षीणतेचे प्रमाण नव्हे का ? ही लोप पावत चाललेली संवेदना कुठे पुस्तकात वाचून किंवा ऐकून आपल्यात येणार नाहीये. तर आपल्या जीवनात आध्यात्मिक अधिष्ठान असेल तर कुटुंबाप्रत, समाजाप्रत संवेदना आपल्यात जागृत असेल म्हणून आपल्या जीवनात स्वामी समर्थ केंद्र महत्वाचे आहे.

 

समाजात ” मी ” आणि ” मी ” भोवती फिरणारा एक वर्ग आहे. जो वर्ग सदैव आपल्याच अहंकारात असतो.. तो वर्ग परमेश्वराचे अस्तित्व मान्यच करत नाही. याउलट फक्त मी माझ्या कष्ठाने माझे साम्राज्य उभे केले आणि त्याच गुर्मीत तो व्यक्ती आध्यात्मापासून, परमेश्वरापासून दूर असतो. त्यामुळे त्याच्या मुलांना संस्कार नावाची गोष्ट माहीतच नसते. त्यामुळे परमेश्वराचा द्वेष करणाऱ्या त्या अहंकारी व्यक्तीला वृद्धपकाळात घराच्या पडवीत किंवा जनावरांच्या गोठ्यात राहायची वेळ येते. संत रामदास स्वामी दासबोध मध्ये सांगतात, असा व्यक्ती पडवीच्या कोपऱ्यात खिजपत पडला आहे, सुना – मुले जेवण वेळेवर देत नाहीये. विविध दुर्दैर व्याधीनी त्याला ग्रासले आहे, प्रचंड दाह, वेदना शरीरातून बाहेर पडत आहे. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे आपले जीवन नकोसे झालेला व आयुष्यभर नास्तिक असलेला तो व्यक्ती शेवटी परमेश्वरालाच साकडे घालतो, ” आत्ता तरी मला उचल, हे जीवन नकोशी झाले आहे, परमेश्वरा आत्ता तरी मला उचल”. पुढे संत रामदासस्वामी म्हणतात आयुष्याच्या शेवटच्या क्षणी परमेश्वर आठवण्याची गरज आलीच. जर आयुष्यभर परमेश्वर आठवला असता तर ही वेळच तुमच्यावर येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या जीवनाची सायंकाळ आंनदात आणि कुटुंबात समाधानाने व्यथित करायची असेल तर हे स्वामी समर्थ केंद्र नक्कीच उपयोगी ठरेल.

 

गुरुशिवाय तुमचे जीवन निरर्थक आहे. भलेही गुगलवर तुम्ही जगातील कोणतीही माहिती क्षणात मिळवू शकाल. तंत्रज्ञानाच्या आधारावर तुम्ही भौतिक सुखसुविधा मिळवू शकाल परंतु शाश्वत आनंद तुम्हाला आध्यात्मिक जीवनातूनच मिळेल आणि त्यासाठी गुरु हा महत्वाचा भाग आहे. मी असे म्हणणार नाही कि, स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करा, किंवा प. पु. गुरुमाऊलींनाच गुरु करा. तुम्ही तुमच्या आई – वडिलांना पण गुरु करू शकता. आदर्शवत असणाऱ्या शिक्षकाला, आपल्या भावाला, बहिणीलाही गुरु करू शकता. परंतु गुरु या शब्दाची जाणीव आपल्यात येण्यासाठी आध्यात्मिक अधिष्ठानाची गरज असते. म्हणून हे स्वामी समर्थ केंद्र तुमच्या – आमच्या जीवनात महत्वाचे आहे.

 

तारुण्यात होणारे विविध आजार, आत्महत्येचा वाढता आलेख, मनोसोपचार तज्ञ् डॉक्टरांकडे वाढलेली रुग्णांची संख्या, ह्या विविध बाबी जर लक्षात घेतल्या तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि अलीकडील तरुणाई प्रचंड नकारात्मकतेने जीवनाकडे बघत असते. जर छत्रपती शिवरायांनी त्यांचे आयुष्य नकारात्मकतेने जगले असते तर ? जर संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून नकारात्मक निर्णय घेतला असता तर ? तुमच्या – आमच्या जीवनाला प्रेरणा व दिशा देणारे आपल्या या महान देशात अनादी काळापासून असंख्य संत, युगपुरुष, महापुरुष, कर्मवीर आहेत. परंतु त्यांच्या विचाराप्रत पोहचण्यासाठी आध्यात्मिक अधिष्ठान गरजेचे आहे. म्हणून तर स्वामी समर्थ केंद्र महत्वाचे आहे.

 

– जयराम शिंदे

श्री स्वामी समर्थ केंद्र, ठाणगाव.

17 जानेवारी 2022

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे