पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या* *योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या*
*योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*नाशिक, दिनांक 16 डिसेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
राज्याचे ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे व शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करूण देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या लाभासाठी 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनंत साखरे यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभाच्या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिला हे https.//ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH.MAHABMS या ॲपवरूनही अर्ज सादर करता येणार आहे.
योजनांची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील वरील संकेतस्थळ तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर अथवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनंत साखरे यांनी कळविले आहे.