सेवा पंधरवड्याच्या कालावधीत प्रलंबित अर्जाचा निपटा रा जलद गतीने करावा.
28 सप्टेंबर, 2022
*सेवा पंधरवडयाच्या कालावधीत प्रलंबित अर्जांचा निपटारा जलद गतीने करावा*
*- दिलीप शिंदे*
*दि.28 सप्टेंबर,2022(विमाका वृत्तसेवा)*
सेवा पंधरवडयाच्या कालावधीत प्रलंबित अर्जांचा निपटारा हा जलद गतीने करुन प्रलंबित अर्ज निकाली काढावे. लोकसेवा हक्क अधिनियमाची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अनुंषगाने व सेवा पंधरवडा निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री शिंदे बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री शिंदे पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यालय हे सेवा विहीत कार्यमर्यादेत देते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभाग प्रमुखांनी समन्वयक अधिका-यांची नेमणूक करुन कार्यालयाची दप्तर तपासणी करावी. सर्व सेवा या विहीत कार्यमर्यादेतच देण्यासाठी सर्व ऑनलाईन सेवा या आपले सरकार पोर्टलवर समाविष्ट करण्यात याव्यात. विभागातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना यावेळी श्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व प्रलंबित अपिलाचा निपटारा विहीत कालमर्यादेत करण्यात यावा. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत. सेवा पंधरवडा कार्यक्रमासंबधीची जनजागृती करण्यात यावी. अधिसुचित सेवांची संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
000000000