उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणणार:ना. गिरीश महाजन .
उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणणार:ना. गिरीश महाजन
नाशिक:- जनमत. संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांपैकी उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला सर्वाधिक जागा निवडून आणणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते ना. गिरीश महाजन यांनीकेले. भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर मध्ये दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी आमदार बाळासाहेब सानप, मीडिया सेंटरचे प्रमुख व प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रवीण अलई,नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख व मीडिया सेंटर उपप्रमुख राहुल कुलकर्णी, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे व नाशिक महानगर सचिव हेमंत शुक्ल उपाध्यक्ष कुणाल वाघ, सुरेश अण्णा पाटील,सुहास शुक्ला आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मीडिया सेंटरचे प्रमुख गोविंद बोरसे व सहप्रमुख राहुल कुलकर्णी यांनी ना.गिरीश महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ना. महाजन यांनी सर्वप्रथम सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपण दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. विविध उमेदवारांच्या भेटी घेतल्या. माजी नगरसेवकांना भेटी घेतल्या. सर्वांना सोबत घेऊन खेळीमेळीमध्ये चर्चा पार पडली. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक कामे मार्गे लावण्यात आली आहेत. बीजेपी व महायुती उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये ताकदीने लढणार आहे. नाशिक जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाला चांगले वातावरण असून उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला सर्वाधिक चांगला निकाल मिळेल. यावेळी महायुती २०१४ व २०१९ पेक्षाही जास्त जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांना चुकीचे नॅरेटिव्ह पसरविण्यात यश आले. आता मात्र खूप मोठा बदल झाला आहे. संविधान बदल व राखीव जागांच्या संदर्भातील चुकीचे नॅरिटीव्ह चालणार नाहीत. धुळे- मालेगाव लोकसभा मतदार संघामधील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला बहुमत होते, केवळ एका विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुमत न आल्याने आमचे उमेदवार पराभूत झाले. यावेळी मात्र ते पाचही मतदार संघ महायुतीकडे येतील. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत, तरुण बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षणाची योजना कार्यान्वित करण्यात आल्यामुळे मुलींचा शिक्षणासाठी फायदा झाला. लाडकी बहीण योजना देखील खूपच लोकप्रिय झाली आहे. आमच्याकडे चांगल्या योजना आहेत, विरोधकांकडे काहीही नाही ते चांगल्या योजना बंद करण्याची भाषा करीत आहेत. या सर्वांमुळे महायुतीला चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत. असे सांगून काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवार उभे केले असले तरी वरिष्ठ नेते माघार घेण्याच्या ४ नोव्हेंबर या तारखेपर्यंत त्यातून मार्ग काढतील. मतदार सुजाण असून ते योग्य उमेदवारालाच मतदान करतील. काहींनी बंडखोरी केली असली तरी भाजपा कोणत्याही बंडखोराला पाठिंबा देत नाही. असा खुलासा त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला. राज ठाकरे यांचा मनसे प्रश्नावर बोलताना त्यांनी त्याबाबत त्या पक्षाला विचारावे लागेल असे स्पष्ट केले. उपस्थित पत्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधिंच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली व सर्वांना पुन्हा एकदा दीपावली शुभेच्छा देऊन पत्रकार परिषदेचा समारोप केला.