१९ वर्षां खालील महिलांची फ्रेंडशिप ट्रॉफी एन डी सी ए गर्ल्स चा दहिसर स्पोर्ट्स वर दुसरा विजय
१९ वर्षां खालील महिलांची फ्रेंडशिप ट्रॉफी
एन डी सी ए गर्ल्स चा दहिसर स्पोर्ट्स वर दुसरा विजय
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे सरू झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षां खालील महिलांच्या फ्रेंडशिप ट्रॉफीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील, अतिशय चुरशीच्या लढतीत एन डी सी ए गर्ल्स संघाने दहिसर स्पोर्ट्स क्लबवर उत्तम सांघिक कामगिरीने केवळ २ धावांनी विजय मिळवला. दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधार वेदिका जोशीची एकाकी झुंज थोडक्यात अपयशी ठरली.
मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न दहिसर स्पोर्ट्स क्लब पॉवर्ड बाय नवनीत फाउंडेशन हा संघ या फ्रेंडशिप ट्रॉफी अंतर्गत , एकदिवसीय ४० षटकांचे मर्यादित एकूण तीन व दोन टी-ट्वेंटी सामने अशी मालिका खेळण्यासाठी नाशिक येथे दाखल झाला आहे. संघाबरोबर दहिसर स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी प्रवीण गोगरी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत.
दुसऱ्या एकदिवसीय ४० षटकांच्या मर्यादित सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या एन डी सी ए गर्ल्स संघाने कर्णधार इशानी वर्मा च्या ३१ धावांच्या जोरावर ४० षटकांत १२८ धावा केल्या . निकिता जोंधळेने १४ धावा केल्या. दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या धनश्री परब व कशिश पटेलने प्रत्येकी २ तर हेतावी शाह, शरण्या फडते, प्रीती यादव व प्राची पंडितने प्रत्येकी १ बळी घेतला.
विजयासाठी १२९ धावांचा पाठलाग करताना दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधार वेदिका जोशीने नाबाद ४० धावा करत शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम ठेवली. अखेर दहिसर स्पोर्ट्स क्लबला १२६ धावांपर्यंत मजल मारता आली. खुशबू पालने १३ व शरण्या फडतेने १२ धावा केल्या. एन डी सी ए गर्ल्सच्या वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर निकिता मोरे , प्रचिती भवर, श्रुती गीते व अस्मिता खैरनार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.शेवटच्या ३ षटकांत दहिसर स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी १० धावा हव्या असताना , निकिता मोरेने केवळ २, श्रुती गीतेने केवळ १ व प्रचिती भवरने ४ धावा देत एन डी सी ए गर्ल्स संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला.
नाणेफेक प्रसंगी उपस्थित प्रशिक्षक प्रवीण गोगरी , भाविक मंकोडी , संदीप सेनभक्त ,पंच विवेक केतकर व योगेश भाकरे , दोन्ही संघ व कर्णधार व वेदिका जोशी छायाचित्र