सर्वच प्रमुख पक्षाच्या रॅलीत सहभागासाठी महिलेस तीनशे, पुरुषास पाचशे रुपये.पाव वडा पाण्याची बाटली.*
*शक्तीप्रदर्शनात सहभागासाठी महिलेस तीनशे, पुरुषास पाचशे रुपये.
:नाशिक. जनमत. सर्वच प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोरांनी सोमवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करीत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बहुतांश उमेदवारांनी हजारोंच्या संख्येंने रॅली काढत, आपणच विजयाचे दावेदार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षात बहुतांश उमेदवारांनी भाडोत्री प्रचारार्थींची गर्दी केल्याचे दिसून आले. महिलेस तीनशे, तर पुरुषांना पाचशे रुपये रोजप्रमाणे हे प्रचारार्थी आणले होते. सोबत वडापाव आणि पाण्याची बाटलीही दिली गेली. दिवाळीअगोदरच ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने प्रचारार्थींना यानिमित्त का होईना रोजगार मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
रॅली, सभा, मेळाव्यांसाठी भाडोत्री प्रचारार्थींचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून रूढ होत आहे. केवळ झोपडपट्यांमधीलच नव्हे तर, मध्यमवर्गीय वस्तीतील लोकदेखील प्रचार कामी रोजंदारी मिळविण्यासाठी पुढे येत आहेत. पाचशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत रोजंदारी मिळत असल्याने, या कामी काही गटच सक्रीय झाले आहेत. सोमवारी शक्तीप्रदर्शनासाठी सर्वच उमेदवारांना रॅलीत नागरिकांची गर्दी हवी होती. त्याबाबतचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. यासाठी काही पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी असते. प्रत्येकाने किमान दोनशे व त्यापेक्षा अधिक नागरिकांना रॅलीत सहभागी करून घेण्याचे टार्गेट दिले होते. त्यानुसार महिलेला तीनशे रुपये व पुरुषाला पाचशे रुपये रोजही निश्चित केला होता. तसेच नाष्टा-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र. याशिवाय प्रत्येकाला पक्षाचे चिन्ह असलेली मफरल आणि टोपीही देण्यात आली. यावेळी काही महिला आपल्या लहानग्यांसोबत रॅलीत सहभागी झाल्या होत्या. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या वेळेप्रमाणे रोजंदारी दिली गेल्याचे अनेकांनी सांगितले.
*नाके पडले ओस*
हाताला काम मिळावे, यासाठी शहरातील नाक्यांवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी दिसून येते. मात्र, सोमवारी शक्तीप्रदर्शनासाठी नाक्यावरील या मजुरांना रॅलीत सहभागी करून घेतल्याने, बहुतांश नाके ओस पडल्याचे दिसून आले. अवघ्या चार तासांसाठीच पाचशे रुपये राेजंदारी दिली जात असल्याने, अनेक मजूर आनंदाने रॅलीत सहभागी झाले. रॅलीत महिलांचाही मोठा सहभाग होता. नाक्यावर मजूरच नसल्याने बांधकाम कंत्राटदारांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.