ब्रेकिंग

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024. *नाशिक जिल्ह्यात 30 हजार मतदान अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक होणार.

 

 

*महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024*

*नाशिक जिल्ह्यात 30 हजार मतदान अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक होणार*

*नाशिक, दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून 30 हजार कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 चे कलम 26 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्हा मतदान अधिकारी / कर्मचारी नेमणूकीचे अधिकार आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी हे कलम 159 अन्वये शासकीय कर्मचारी यांच्या सेवा विविध निवडणूक कामकाजासाठी वर्ग करून त्यांना निवडणुकीचे कामकाज सोपवीत असतात. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन निवडणुकीची पूर्वतयारी किमान एक वर्ष आधीपासुनच करत असते. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळाचे व्यवस्थापन हे जिल्हा प्रशासनासाठी आवाहन असते.

 

अचूक मनुष्यबळाची निवड करणे, त्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून अधिकारी-कर्मचारी यांची माहिती मागविणे, आयोगाच्या सॅाफ्टवेअरमध्ये डाटा एंट्री करणे, मतदान अधिकारी व कर्मचारी यांची सरमिसळ ( Randomization ) करणे, नेमणूकीचे आदेश तयार करणे , मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षणात विविध महत्वाच्या बाबी, नियम, कायदे समजावून सांगणे, हस्तपुस्तिका देणे, मतदान यंत्रांचा सराव करून घेणे इत्यादी बाबी जिल्हा प्रशासनाकडून हाताळल्या जातात. मतदान केंद्रांवरील अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी पॅावर पॅाइंट प्रेझेंटेशन आणि स्लाईड़ शो द्वारे विविध तपशील समजावून सांगण्यात येतो. प्रशिक्षणात निवडणूकीसाठी वापरणेत येणारे विविध साहित्य, फॅार्मचे विहित नमुने, पाकिटे, हस्तपुस्तिका, दिशानिर्देशांचा संच इत्यादी बाबींची सखोल तयारी करून घेण्यात येते. या विविध कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी नियुक्त करतात.

 

मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी पथके यांना पोहोचविणे, परत आणणे, यासाठी मतदान केंद्रानुसार मार्गाचे आराखडा तयार करणे, अधिकारी –कर्मचारी संख्या आणि मतदान केंद्रांचे क्षेत्र यानुसार वाहनांचे नियोजन इत्यादी बाबी प्रशासनाकडून लक्षात घेतल्या जातात. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात सहाय्यक कर्मचारी यांची आवश्यकता असते

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता नाशिक जिल्ह्यात एकूण 4 हजार 919 मतदान केंद्र आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष – 5 हजार 411 , मतदान अधिकारी क्र. 1 करिता – 5 हजार 411 तर मतदान अधिकारी क्र. 2 व 3 करिता 10 हजार 822, मतदान कर्मचारी – 5 हजार 411 तसेच आवश्यकतेनुसार राखीव अधिकारी – कर्मचारी लक्षात घेऊन कर्मचा-यांचा डाटा जिल्हा प्रशासनाने संकलित केला आहे. मतदान केंद्र स्थळी ( साधारण 3 ते 4 मतदान केंद्र संख्या ) एक पाळणाघर देण्यात येणार असून या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी यांची नेमणूक तसेच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लावणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणेकामी सहाय्य करणे, व्हील चेअरसाठी मदत करणे यासाठी एनसीसी/एनएसएस/स्काऊट-गाईड चे विद्यार्थी यांची मदत घेण्यात येणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार संवेदनशील मतदान केंद्रावर एक सूक्ष्म निरीक्षक देखील असणार आहे.

 

निवडणूकीसाठी पोलिस विभाग देखील सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी यांची नेमणूक असेल तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी पोलिस विभागाची विविध भरारी पथके, स्थिर पथके, शीघ्र कृती दल, राखीव पोलिस दल हे पोलिस आयुक्त नाशिक शहर आणि पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे नियंत्रणाखाली कार्यरत असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे