तुर्की देशातील बाजरीचे बी तीन फुटाचे आले कणीस. भविष्यात बाजरीचे उत्पन्न होणार मोठ्या प्रमाणात.

बारामती: वाघळवाडी येथील प्रगतशील शेतकरी सतीशराव सकुंडे यांनी आपल्या शेतामध्ये तुर्की देशामधील बाजरीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे सोयाबीनच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले बाजरीचे पीक जोमदार आलेले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याचीही अपेक्षा त्यांना आहे. बाजरीचे कणीस तब्बल ३ फुटांपर्यंत लांब आहे.
बारामती तालुक्यामध्ये अनेक शेतकरी बाजरीचे पीक घेत असतात. मात्र त्या कणसाची लांबी जास्तीत जास्त एक फुटापर्यंतच असते. तुर्की देशामधून आलेले हे बाजरीच्या वाणाचे कणीस तीन फुटांपेक्षा जास्त वाढत असल्याने यातून भरघोस उत्पन्न मिळणार आहे. सकुंडे यांनी त्यांच्या नऊ एकर क्षेत्रामध्ये ४ जुलै रोजी सोयाबीन आणि बाजरीची या पिकांची पेरणी केली होती. आंतरपीक असूनही सोयाबीन आणि बाजरी ही दोन्ही पिके जोमदार वाढली आहेत. सोमेश्वरनगर परिसर वास्तविक ऊस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सकुंडे यांच्यासारखे अनेक शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. तुर्की वाणाच्या बाजरी पिकावर कूस जास्त असल्याने पक्षी त्यांना खात नाहीत. त्यामुळे पक्षांपासून बाजरीचे चांगले संरक्षण होते.
ही बाजरी खायलाही खूप चवदार आहे. या शिवाय येणाऱ्या काळामध्ये ही बाजरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ करणारी ठरणार आहे. या बाजरीतून प्रति एकरी ४० क्विंटल उत्पन्न मिळते. मात्र सकुंडे यांनी सोबतच सोयाबीनचे आंतरपीक घेतल्यामुळे प्रति एकरी १५ क्विंटलचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा सकुंडे यांना आहे. एकीकडे तालुक्यातून बाजरी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना देखील सकुंडे यांनी केलेल्या प्रयोगाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. बाहेरील अनेक शेतकरी ही बाजरी पाहण्यासाठी येत आहेत. तुर्की देशातून येणारे बियाणे प्रति किलो दीड हजार रुपये या दराने सकुंडे यांनी खरेदी केलेले आहे. बाजरीसह सोयाबीन ही जोमदार आले असून सोयाबीनला फुलकळीसह मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या दिसत आहेत. १४०७ व ११८८ या वाणाचे त्यांनी सोयाबीन केले आहे.
वाघळवाडीचे माजी सरपंच सतीश सकुंडे यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवत चांगली प्रगती साधली आहे. तुर्की वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना कमी दरामध्ये उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सतीश सकुंडे यांनी दिलेली आहे. सोमेश्वर परिसरामध्ये तुर्की वाणाचे बाजरीचे पीक प्रथमच घेतले आहे. सोयाबीन आणि बाजरी या आंतरपीकाचा प्रयोग यशस्वी झालेला असून शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नासाठी शेतात असे नवनवीन प्रयोग राबवावेत, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी सतीश सकुंडे यांनी दिलेली आहे