दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांचे दारी’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करावे* *: जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांचे दारी’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करावे*
*: जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*नाशिक, दिनांक : 29 ऑगस्ट, 2023 ( वृत्तसेवा):*
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सातत्याने योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम 5 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी कार्यक्रम नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सिमा अहिरे, भीमराज दराडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरूण सिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, कौशल्य विकास विभागाच्या सहा. आयुक्त अनिसा तडवी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तहसिलदार राजश्री अहिरराव, रचना पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे होणार असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आणतांना त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच अन्य विभागांनी समन्वयाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाचे दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.