गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी* *अर्ज सादर करावेत*
*गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजनेसाठी*
*अर्ज सादर करावेत*
*नाशिक, दिनांक: 29 ऑगस्ट, 2023 ( वृत्त):*
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांनी अर्ज सादर करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
राज्यात चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या व्यक्ती असून त्यांची उपजिविका यावर आधारित आहे. या योजनेंतर्गत असा व्यवसाय करणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींना ऊन, वारा, पाऊस या पासून संरक्षण व्हावे त्यासोबतच त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना महापालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानावर पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जातात.
योजनेच्या लाभासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजार पेक्षा अधिक नसावे. अर्जदार ज्या भागात स्टॉल मागत असेल ती जागा स्वमालकीची असावी किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड, किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अथवा मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असणे आवश्यक आहे.
इतर अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, श्री.नांदगावकर यांनी कळविले आहे.