ब्रेकिंग

नाशिक विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे पूर्ण; 3 हजार 438 हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली येणार*

*नाशिक विभागात लोकसहभागातून 1 हजार 719 बंधारे पूर्ण; 3 हजार 438 हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली येणार*

*नाशिक, जनमत

यावर्षी विभागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नाले व ओढ्यांमधून पाणी प्रवाही आहे, ते पाणी पारंपरिक पद्धतीने अडवून पुढील आठ महिन्यांसाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करुन वनराई बंधारा बांधण्यात येतो. यामध्ये सिमेंट, खतांची रिकामी पोती, माती वाळू इत्यादीचा वापर करून तात्पुरता वनराई बंधारा बांधला जातो. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून रब्बी पिके,बिगर हंगामातील पिकांची पाण्याची गरज भागवता येईल. तसेच ग्राम पातळीवर पाण्याची गरज काही अंशी भागविता येईल.

नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 1 हजार, 719 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 344 टी.सी.एम. जलसाठा अडविला असून रब्बी हंगाम 2022 मध्ये 3 हजार 438 हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, तूर, मका, टोमॅटो, वाल व इतर भाजीपाला पिकांचे क्षेत्र सिंचनाखाली आले असून लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषि अधिकरी विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.

विभागात आजपर्यंत नाशिक 959,धुळे 216, नंदूरबार 281, जळगाव 263 असे एकूण 1 हजार 719 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. नाशिक विभागात लोकसहभागातून एकूण 11 हजार 560 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर 2022 अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याद्वारे 2 हजार 312 टी.सी.एम पाणीसाठा निर्माण होऊन 23 हजार 120 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित पाणी देण्याची सोय होणार आहे. एका वनराई बंधाऱ्यापासून सरासरी दोन हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. काही ठिकाणी जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध होणार असून संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

*वनराई बंधाऱ्यांचे फायदे*

वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पाणी पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते. तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला,कडधान्य, कलिंगड, रब्बी तृणधान्य गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे