आयुष्यमान भारत देश वासियांना ठरली संजीवनी. डॉक्टर भारतीय पवार.
*‘आयुष्मान भारत’ देशवासियांना ठरली संजीवनी : डाॅ भारती पवार*
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब आणि वंचित कुटुंबांना रोकड रहित, कागदरहित आणि सहजसाध्य आरोग्य सेवा आणि उपचार प्रदान केल्यामुळे उपचारांवर आवाक्याबाहेर खर्च करण्याच्या त्रासातून, तसेच गंभीर आणि प्रदीर्घ आजारामुळे आणि महागड्या उपचारांमुळे येणाऱ्या आर्थिक दिवाळखोरीतून त्यांची सुटका झाली असून ही योजना देशवासियांसाठी संजीवनी ठरली आहे, असे मत केंद्रीय मंत्री डाॅ. भारती पवार व्यक्त केले.
योजनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील या योजनेच्या काही लाभार्थींशी केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. मनसुख मांडविय आणि डाॅ. पवार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला झालेले गंभीर आजार, त्यावरचे न परवडणारे उपचार, त्यामुळे झालेला त्रास याबाबत त्यांनी माहिती दिली. त्या आजारांच्या उपचारांवर होणारा खर्च आपल्याला परवडणारा नव्हता, मात्र आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आपल्याला उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाले, तसेच या योजनेच्या नामिकेवर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार मिळू शकले, असे सांगत, त्यांनी समाधानाची आणि आनंदाची भावना व्यक्त केली.
डॉ.मनसुख मांडविय यांनी यावेळी या योजनेच्या विविध वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. ही योजना, सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सरकारच्या मिशनला बळ देते आहे, असे ते म्हणाले. या योजनेत अद्याप सहभागी न झालेल्या राज्यांनी, नागरिकांच्या हितार्थ परवडण्याजोगी आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 कोटींपेक्षा जास्त AB-PMJAY कार्ड तयार करण्यात आली असून 3.8 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) च्या ठळक वैशिष्ट्यांबाबत सांगताना, ABHA हेल्थ आयडीमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडून येतील, असा विश्वास डॉ. मांडविय यांनी व्यक्त केला.