गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
दिनांक: 16 सप्टेंबर, 2022
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा*
*नाशिकजनमत. , दिनांक: 16 सप्टेंबर, 202
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ 2015-16 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.
आपला देश कृषीप्रधान देश असून राज्यातील अर्थकारण हे प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात जसे वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. तर काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या अनुषंगाने अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू केली आहे. ही योजना दि युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. आपल्या परिसरात दुर्दैवाने शेतकरी अपघात झाल्यास संबंधितांनी 1800224030 या टोल फ्री क्रमांकांवर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*लाभार्थी पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रे*
राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी असणे आवश्यक, शेतकरी म्हणून संबंधित व्यक्तिच्या नावाचा समावेश असलेला सातबारा/आठ-अ नमुन्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल अशी संबंधित फेरफार नोंद म्हणजेच नमुना नंबर सहा-ड, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर सहा-क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, अपघाताचे स्वरूपानुसार पुराव्या दाखल सादर करावयाच्या प्रपत्र-क मध्ये नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.