नाशिकला बस्तान बसवल्यापासून काही गोष्टींचा दंडक मी स्वतःवर लावलेला आहे. त्यातली अग्रक्रमी गोष्ट म्हणजे ट्रेकिंग. जळगावला ट्रेक या सुविधेची वानवा असल्यामुळे माझ्याच गावाला मी कायम नावं ठेवत आलो, अजूनही ठेवतो; पण, त्याला एकीकडे नावं ठेवत असतांना आता नाशिकला संधी मिळत असताही घरी बसून राहाण्याचा करंटेपणा करायचा नाही, असं मी ठरवलं. त्यामुळे ऑगस्ट, २०२१ मध्ये इथे आल्यापासून शक्य तितकी भटकंती करतोय. हरिहर वगैरे आधीच झाले होते, आता उटवड, रामशेज, उंबरखिंड, इ. नव्या जागांची पिसं टोपीत खोवली आहेत. त्याच परंपरेतली एक नवी जागा आज सर झाली- त्रिंगलवाडी!
माझी ट्रेकिंगची आवड बघून इथे राहत असलेल्या, आणि ट्रेकिंगमध्ये ‘प्रो’ असलेल्या माझ्या आत्याने मला एका ग्रूपला जोडून दिलं- VG tours and adventures, ज्याचे सर्वेसर्वा हे विश्वनाथ मूर्ती नावाचे ‘जॉली’ या श्रेणीत पूरेपूर बसणारे आणि अत्यंत मनमिळाऊ असे लीडर आहेत. त्यांना मी (आणि माझे बहुतांश सगळे सहट्रेकर्स) विशू दादा म्हणतो. उटवड सारखा तसा अवघड ट्रेक मी दादामुळेच करू शकलो. त्यामुळे तो त्रिंगलवाडीला नेतोय म्हटल्यावर मी एका पायावर तयार झालो.
काल सकाळी ५.३० च्या सुमारास आमची फौज बाँबे नाक्यावरून निघून ‘रेनफॉरेस्ट रिसॉर्ट’समोर नाश्त्यासाठी थांबली. आता हिवाळा+नाशिक+सकाळी ७.१५ ची वेळ, या समीकरणाचा परिणाम काय असतो, हे सांगायला नकोच. अर्थात, उगवतीच्या दिशेला नुकतंच तांबडं फुटत असतांना तळवे एकमेकांवर घासत चहा-नाश्त्याची वाट बघण्याचं सुख अनुभवायला शहरी मंडळी वाटेल ते द्यायला तयार होतात; तसेच आम्हीही झालो. तिथून साधारण अर्ध्या तासावर त्रिंगलवाडी गावात सगळ्यांचे रथ पार्क झाले आणि चालायला सुरुवात झाली.
तोवर फौजेतल्या अनेकांशी ओळखी झाल्या होत्या. काहींशी होत होत्या. एकूण १६ जणं होतो. सगळी एकसेएक अवलीया मंडळी. आवड, जिद्द आणि शारिरीक क्षमता याच्या जोरावर वय, व्यवसाय, वेळ, या कशालाच खिजगणतीत न धरता उभा सह्याद्री पादाक्रांत होऊ शकतो, याची मूर्तीमंत उदाहरणं होती सगळी. गप्पा मारतांना हरिश्चंद्र, रतनगड, AMK, अशी नावं casually येत होती. सोबत असलेल्या दिप्ती साळवे यांचे तर १०० ट्रेक पूर्ण झाले होते (इतके दिवस मी ५ वर्षांत कॉलेजलाही गेलो नसेन!). आमच्यासोबत एक चक्क ८-९ वर्षांचा मुलगाही होता- अधिराज नाव त्याचं; हा मुलगा ट्रेकमध्ये संपूर्ण ग्रूपच्या पुढे होता! असा आमचा समूह मस्त गप्पाटप्पा करत, फोटो-व्हिडीओ काढत साधारण सकाळी ८.१५-८ ३० च्या सुमारास त्रिंगलवाडी चढायला लागला.
आता जरासं या जागेबद्दल- ट्रेक तसा फार मोठा किंवा अवघड मुळीच नाहीये. एकूण चालणं ५ किमीच्या आसपास. फक्त पावसाळ्यात थोडा अवघड होण्याची शक्यता आहे, याचं कारण या ट्रेकमध्ये ‘जंगल’ असं कुठेच नाहीये. चढण लागली की उजवीकडे डोंगर, डावीकडे सरळ उतरण! पण सध्या हिवाळा असल्याने चिखल किंवा निसरडं नव्हतं, त्यामुळे सहज चढता येत होता. तिथे सुरुवातीलाच एक जैन लेणे आहे. लेण्यात सुरेख कोरीवकाम आहे. पडझड बरीच आहे, पण जे उरलंय त्यातून खांबावरचे यक्ष, गाभाऱ्यातील तीर्थंकर मूर्तीचे वृषभरूपी ‘लांच्छन’, अशा काही हिंदू पद्धतीला जवळ जाणाऱ्या खाणाखुणा दिसतात. बाहेर ठेवलेल्या भग्नावशेषांत तर चक्क गजान्तलक्ष्मी आहे! तिथे जरावेळ थांबून आम्ही वर निघालो. अगदी टोकाशी पोहोचायला तिथे दोन दगडी जिने आहेत. त्यातल्या मागच्या आणि चढायला जरा ‘थ्रिलिंग’ अशा पायऱ्यांनी आम्ही वर पोहोचलो. तिथे असलेल्या मारूतीच्या शिल्पासमोर विशू दादाने दणदणीत आवाजात ‘प्रौढप्रतापपुरंदर..’ घोषणा दिली; खरंच गड, डोंगर कोणताही असो, चढतांना कितीही थकवा येऊ देत- ही घोषणा आणि नंतरचं ‘जय!’ म्हणतांना सगळी मरगळ निघते!
वरती गेल्यावर तीन मुख्य अवशेष दिसतात. एक पाणीटाक्याचे, आणि दोन इमारतींचे. त्या दोनपैकी एका इमारतीचातर फक्त पायाच शिल्लक आहे- त्यामुळे नक्की काय होतं, हे माझ्यासारख्या नवख्याला नाही कळालं. त्याच्या आतमध्ये होमकुंडासारखा चौकोनी दगडी खड्डा आहे- पण जागेचा एकूण आकार मंदिरासारखा नाही. दादाने आम्हाला माहिती दिली की त्रिंगलवाडीचा डोंगर हा जकातीसाठी वापरात होता- त्या अनुषंगाने दुसऱ्या इमारतीच्या अवशेषांत दगडी खिडक्या भिंतीलगत सापडल्या- त्यामुळे ती शासकीय इमारत असूही शकते. पण, त्याच खिडक्या मागून बंद दिसल्या- मग दीप ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा का? असो. सध्यातरी फक्त प्रश्नच आहेत. कोणाला याची उत्तरं माहिती असतील, तरी कृपया सांगावी- पुन्हा नवी माहिती घेऊन तिथे जाता येईल!
हे अवशेष बघून, जरा विश्रांती आणि पोटोबा करून आम्ही सगळे खाली यायला निघालो. जसं मी सांगितलं, की त्रिंगलवाडी मुळात फार मोठा नाहीये, त्यामुळे उतरणं पटकन् झालं. खाली येऊन जिथे नाश्ता केला होता, तिथेच विशू दादाने जेवणाचीही सोय केली होती- व्हेजही आणि माझ्यासारख्या पापी लोकांसाठी चिकनही! खरंतर वेळेच्या आधीच ट्रेक आटोपला होता, त्यामुळे परतीला जरा डीटूर करून इगतपुरीजवळच्या एका तळ्यापाशी आमचा एक टप्पा झाला- पंचपक्वान्नाच्या जेवणानंतरचा विडा कसा छान वाटतो? तसा तो टप्पा होता. येतांना विचार करतांना माझी मलाच गंमत वाटली- इनमीन अर्ध्या दिवसाच्या सहलीत मला काय काय मिळालं होतं? महाराष्ट्रतली नवी जागा, अनेक सम-असमवयस्कांशी नवी मैत्री, आणि मुख्य म्हणजे नवे प्रश्न- काही उत्तरित, काही अनुत्तरित!
धन्योsहम्.
-शुभंकर अत्रे.