हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना जम्मू-काश्मीर सरकारतर्फे 10 लाखांची मदत

हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना जम्मू-काश्मीर सरकारतर्फे 10 लाखांची मदत
श्रीनगर, दि. २३ वृत्तसंस्था काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील वैसरन येथे मंगळवारी लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जम्मू आणि काश्मीर सरकारने जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
दहशतवाद्यांनी काल पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. पहलगाममध्ये झालेल्या या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याने मला खूप धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. निष्पाप नागरिकांवरील या क्रूर आणि अर्थहीन कृत्याला आपल्या समाजात स्थान नाही. आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, अशा भावना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रियजनांच्या नुकसानाची भरपाई कोणत्याही पैशाने होऊ शकत नाही, परंतु समर्थन आणि एकतेचे प्रतीक म्हणून, जम्मू-काश्मीर सरकार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये, अशी मदत जाहीर करत आहे. पीडितांना त्यांच्या घरी परत नेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या क्रूरतेमागील लोकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.