पार-गोदावरी प्रकल्प मार्गी लावून अवर्षणग्रस्त येवला-नांदगाव जलसमृद्ध करणार* *मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही*
*पार-गोदावरी प्रकल्प मार्गी लावून अवर्षणग्रस्त येवला-नांदगाव जलसमृद्ध करणार*
*मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही*
*नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट*
*नाशिक जनमत. येवला, दि. ११ नोव्हेंबर:–* अवर्षणग्रस्त येवला आणि नांदगाव मतदारसंघाची तहान भागविली जाईल. हे दोन्ही मतदारसंघ जलसमृद्ध केले जातील, अशी ठाम ग्वाही अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नांदगाव तालुक्यातील जातेगाव व न्यायडोंगरी गटातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्री छगन भुजबळ यांची येवला संपर्क कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, पुणेगाव- दरसवाडी कालव्याद्वारे पाणी नांदगाव मतदार संघामध्ये नेण्यासाठी पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ चे काम प्रस्तावित आहे. या माध्यमातून पार खो-यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ३.०१ टी.एम.सी. पाणी तसेच पार तापी नर्मदा लिंक प्रोजेक्ट मधील नार व पार खोऱ्यातील शिल्लक असलेले ४.६७ टी.एम.सी. पाणी असे एकूण ७.६८ टी.एम.सी. पाणी आपण मांजरपाडा मार्गे पुणेगाव धरणातून गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत. यामुळे कायमस्वरुपी अवर्षणप्रवण दुष्काळी येवला व नांदगाव तालुक्याला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“
ते म्हणाले की, या पाण्यामुळे येवला व नांदगाव मतदारसंघासह दिंडोरी, चांदवड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यास सिंचनाचा लाभ होईल. त्याचप्रमाणे पुणेगाव धरणामध्ये अधिकचे पाणी आणण्यासाठी गुगुळ आणि पायरपाडा या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचे पाणी पुणेगांव मध्ये वळवण्यासाठी सर्वेक्षण करुन सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरु आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लावून अवर्षणग्रस्त येवला नांदगाव सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कैलास पाटील, सोपान पवार, कैलास नंद, सुशील आंबेकर, चंद्रभान कोरडे यांच्यासह लोहशिंगवे, सोयेगाव, खिर्डी, भवरी, बानगाव खुर्द, बानगाव बुद्रुक, टाकळी खुर्द, टाकळी बुद्रुक, वडाळी खुर्द, वडाळी बुद्रुक, तांदुळवाडी, माणिकपुंज, मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, दहेगाव यासह विविध गावातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.