जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष निरंतर सुरू ठेवावेत शोध व बचाव साहित्याची देखभाल दुरुस्ती तात्काळ करावी.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
*जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष निरंतर सुरु ठेवावेत;शोध व बचाव साहित्याची देखभाल दुरुस्ती तात्काळ करावी*
*: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे*
*मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना सूचना*
*नाशिक, दि. 14 जून ,2022 (विमाका वृत्तसेवा):*
प्रत्येक जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. येत्या पावसाळ्यात जास्तीच्या पावसामुळे होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय व तालुकस्तरीय नियंत्रण कक्ष निरंतर सुरु ठेवावेत. मान्सून काळात लागणाऱ्या शोध व बचाव साहित्याचा आढावा घेवून आवश्यक दुरुस्त्या तात्काळ कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्यावेळी विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी व विभागीय आपत्ती व्यवस्थापक समन्वयक उपस्थित होते.
अधिकचा पाऊस झाल्यावर असुरक्षित ठिकाणी निर्माण होणाऱ्या आपत्तीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे सोपे व्हावे, यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्याधिकारी व संबधित यंत्रणांनी असुरक्षित ठिकाणी मॉक ड्रील करावे यावे. जिल्हयांतील सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती, रस्ते, पुल आदींची तपासणी संबंधित यंत्रणा प्रमुखांसमवेत करावी. नियंत्रण कक्ष व EOC मध्ये तात्काळ प्रतिसाद प्रणाली (Incident Response System) कार्यान्वित राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्याने जिल्हयांतील नागरी संरक्षण दल, होमगार्डस यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
*जळगाव प्रमाणे ‘गजर प्रणाली’ विकसित करावी*
जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाटबंधारे विभागामार्फत धरणामधुन किती क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडला आहे याची आसपासच्या नागरिकांना सूचना देण्यासाठी ‘गजर प्रणाली’ (अलार्म सिस्टीम) विकसीत केलेली आहे. त्याप्रमाणे इतर जिल्हयांनी सुध्दा अशी यंत्रणा विकसित करावी. जेणेकरुन त्याद्वारे नागरिकांना आपत्ती पासून बचाव करणे शक्य होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापना संबंधित सर्व यंत्रणांशी योग्य तो समन्वय ठेवावा. तसेच जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या ठिकाणी जलसंपदा विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता व उप अभियंता मान्सुन काळात पुर्णवेळ उपस्थित राहतील याबाबत आवश्यक त्या सुचना देण्यात याव्यात,अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
नाशिक विभागात सर्व जिल्हयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. त्यातील विविध यंत्रणांचे , यंत्रणाप्रमुखांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात यावे. तसेच तालुका व गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात करण्यात यावे. विभाग स्तरावरील तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षामध्ये 24X7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, महत्वाचे दुरध्वनी क्रमांक, जीव रक्षकांची यादी, पोहणारे, गिर्यारोहक , सर्पमित्र इ. यादी नियंत्रण कक्षात उपलब्ध करुन द्यावे.
आर्मी, एसडीआरई, एनडीआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथक यांनी पुरपरिस्थिती उद्भवणाऱ्या तालुक्यांची व गावांची पाहणी करावी. नंदुरबार जिल्हयामध्ये पावसाळयात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा ओषधसाठा करण्यात आलेला असून इतर जिल्हयांमध्ये आवश्यक कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या.
*विभागातील शोध व बचाव साहित्य पुढीलप्रमाणे:*
नाशिक विभागाला एकूण 1 हजार 33 शोध व बचाव साहित्य उपलब्ध झाले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याला रबरी बोट 09, फायबर बोट 01, लाईफ बॉयज 20 तर लाईफ जॅकेटस 400 असे एकूण 430 शोध व बचाव साहित्य उपलब्ध झाले आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याला रबरी बोट 05, फायबर बोट 02, लाईफ बॉयज 70 तर लाईफ जॅकेटस 200 असे एकूण 277 साहित्य उपलब्ध झाले आहे. धुळे जिल्ह्याला रबरी बोट 4, फायबर बोट 01, लाईफ बॉयज 68 तर लाईफ जॅकेटस 84 असे एकूण 157 साहित्य उपलब्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्याला रबरी बोट 02, फायबर बोट 03, लाईफ बॉयज 20 तर लाईफ जॅकेटस 100 असे एकूण 125 तर नंदुरबार जिल्ह्याला रबरी बोट 02, फायबर बोट 02, लाईफ बॉयज 20 तर लाईफ जॅकेटस 20 असे एकूण 44 शोध व बचाव साहित्य उपलब्ध झाले आहे.