मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
*मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन*
*नाशिक, दिनांक 16 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी मार्च, 2024 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) हे 30 एप्रिल, 2024 पर्यंत सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पंतम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनुसार सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच व्यापारी व खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यवसाय, कारखाने यांचा समावेश करण्यात आला आहे. या आस्थापनांनी वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळांची माहिती (ई-आर-1 विवरणपत्र) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर माहे मार्च, 2024 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सादर करावे.
मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर 1) संकेतस्थळावर सादर करताना दिलेल्या लिस्ट ‘अ मधील जॉब या पर्यायावर क्लिक करून एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉग इन करून ई-आर रिपोर्ट मधील ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करून माहिती सादर करणे आवश्यक आहे. विवरणपत्र सादर करण्याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत दूरध्वनी क्रमांक 0253-2993321 यावर संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.