राज्य सेवा हक्क आयोगाचा दुसरा वर्धापन दिन* *त्र्यंबकेश्वर येथे साजरा*
*राज्य सेवा हक्क आयोगाचा दुसरा वर्धापन दिन*
*त्र्यंबकेश्वर येथे साजरा*
*नाशिक, दि. 20 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित सेवा देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा एप्रिल 2015 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. शासनाच्या एकूण 511 सेवा या कायद्यांतर्गत समाविष्ट असून त्यांची सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी सेवा हक्क आयोगाच्या वतीने आयोगाचा दुसरा वर्धापन दिन त्र्यंबकेश्वर येथे तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन साजरा करण्यात आला, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभागाचे कक्ष अधिकारी उदय काण्णव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सेवा हक्क आयोगाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत कायद्यात अंतर्भूत असलेल्या सेवा विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नागरिकांना वेळेत दिल्या जातात किंवा कसे याबाबत पडताळणी करण्यात आली. तसेच बैठकीनंतर त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय व पुरवठा शाखा या विभागांची कार्यालये व नगरपरिषद हद्दीतील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यासोबतच नूतन त्र्यंबक विद्यालय व माध्यमिक कॉलेज येथील विद्यार्थ्यांना सेवा हक्क कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर खंबाळे यथील आधारतीर्थ आश्रम व श्रीमती गारडा बाल सदन, अनाथ बालकाश्रम येथे भेट देवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी व आई वडीलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या, असेही श्री. काण्णव यांनी कळविले आहे.
लोक सेवा हक्क कायद्यामध्ये शासनाचे सर्व व राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत आणि महामंडळे अशा स्थानिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचित केलेल्या सेवा विहित मुदतीत प्राप्त करून घेण्याचा अधिकार नागरिकांना या कायद्यामुळे मिळाला आहे. या कायद्यांतर्गत येणाऱ्या 511 सेवांपैकी बहुतांश सेवा ह्या ऑनलाईन असून उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, जन्म मृत्यू दाखला या व इतर अनेक सेवा या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. कायद्यात समाविष्ट असलेल्या सेवा नागरिकांना मुदतीत प्राप्त न झाल्यास सेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदींनुसार विहित नमुन्यात प्रथम व द्वितीय अपिल दाखल करता येते. तसेच तृतीय अपिल नाशिक येथील आयोगाच्या कार्यालयात दाखल करता येते. अर्जदार हे अपिल ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निःशुल्क पद्धतीने दाखल करू शकतात, अशी माहितीही उदय काण्णव यांनी दिली आहे