माजी सैनिक व वीरपत्नी पाल्यांचा विशेष गौरव पुरस्काराने होणार सन्मान;* *20 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत*
*माजी सैनिक व वीरपत्नी पाल्यांचा विशेष गौरव पुरस्काराने होणार सन्मान;*
*20 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत*
*नाशिक दि. 01 सप्टेबर , 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी यांच्या पाल्यांचा 2022-2023 या वर्षातील विशेष गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने माजी सैनिक, वीरपत्नी यांच्या पाल्यांनी या पुरस्कारासाठी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले (निवृत्त) यांनी केले आहे.
माजी सैनिक व वीरपत्नी यांच्या पाल्यांना गौरव पुरस्कार योजनेंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच वीरपत्नी यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये 10 वी, 12 वी परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना रूपये 10 हजार एकरकमी देण्यात येतात. तसेच या पुरस्कारांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेतलेले व पदक प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रात पुरस्कार प्राप्त स्पर्धक, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणे, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक काम करणारे व्यक्ती यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येते.
या पुरस्कारासाठी माजी सैनिकांच्या पाल्याचे वय 25 वर्षांपर्यंत असावे तसेच अविवाहित मुली या योजनेसाठी पात्र असणार असून त्यासाठी अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. IIT, IIM, AIIMS अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या पाल्यांना रूपये 25 हजार विशेष गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज 20 सप्टेबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत. अपूर्ण कागदपत्र असलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याबाबतच्या अधिक माहितीसाठी 0253-2577255 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. कापले यांनी कळविले आहे.