नद्यांचे प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी* *: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे*
वृत्त क्र.42 दि. 15 फेब्रुवारी, 2023
*नद्यांचे प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी*
*: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे*
*गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठक संपन्न*
*नाशिक दि. 15 फेब्रुवारी, 2023 (विमाका वृत्तसेवा):*
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. गोदावरीसह इतरही नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी यंत्रणा काम करत असून नद्या प्रदूषणमुक्त ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठकीत सांगितले.
गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रदीप चौधरी, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, मुख्य अभियंता निर्मिती औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे सुनिल पाटील, उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त व्ही.एम.मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सांडपाण्याच्या ऑडिट करणे गरजेचे आहे नदीपात्रातून उचलणारे पाणी, प्रक्रिया केलेले पाणी व प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणारे पाणी याचा हिशोब देवून सर्व नद्यांच्या पाण्यासंबधी ऑडीटची कार्यवाही करावी. महानगरपालिकेने नदी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे, अशास सूचना श्री गमे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी रामकुंडावर निर्माल्य कलशाची संख्या वाढविण्यात यावी. रामकुंडावर प्लास्टीक पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी कापडी पिशव्यांचे वेण्डींग मशिन लावण्यात यावे. तसेच नाल्यांच्या स्थळांचे क्राँकीटीकरण करण्यात येवू नये, अशा सूचना श्री गमे यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.