काळजावर दगड ठेऊन देशाच्या रक्षणासाठी दोन्ही मुलांना सैन्यात पाठविणाऱ्या नांदगाव बुद्रुकच्या मथुराताई गायकर यांचा आदर्श
काळजावर दगड ठेऊन देशाच्या रक्षणासाठी दोन्ही मुलांना सैन्यात पाठविणाऱ्या नांदगाव बुद्रुकच्या मथुराताई गायकर यांचा आदर्श
बेलगाव कुऱ्हे : लक्ष्मण सोनवणे
सैनिकाचे जीवन हे अतिशय खडतर असते. मुलांना सैन्यभरतीत जाण्यासाठी प्रत्येक मातेचा विरोधच असतो.
मात्र स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांना देशासाठी समर्पित केलेल्या माता फार कमी प्रमाणात पहावयास मिळतात. काळजावर दगड ठेवून मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या मुलांना सैन्यात पाठवून मजबूत बनवणाऱ्या नांदगाव बुद्रुकच्या मथुरा गायकर ह्या खऱ्या योध्दा आहेत. त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम बघून डोळे पानवले जातात. श्रीमती गायकर यांना इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मथुरा ताई गायकर यांनी शेतीत अतिशय कष्ट करून दोन्ही मुलांना शंकर आणि नितीन (श्याम) यांना सैन्यात दाखल केले. आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचे देखील 14 वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून आपल्या मुलांना सुध्दा शिकवले. बापाचे छत्र हरपलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यात पाठविण्यासाठी जीवाचे रान केले. दोन्ही मुले बाहेर असताना कुठल्याच आईला झोप लागणार नाही. ज्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांना देशासाठी समर्पित केले. अशा मातांचा अभिमान वाटतो असे प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे यांनी सांगितले.
त्यांचा मोठा मुलगा शंकर गायकर आर्टीलरीच्या मिडीयम रेजिमेंट युनिट मध्ये 13 वर्षापासून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत आसाम, दिल्ली, पंजाब, श्रीनगर येथे आपली सैन्य सेवा बजावली आहे. त्यांचा लहान मुलगा नितीन (श्याम) हे सुध्दा आर्टीलरी च्या मिडीयम रेजिमेंट मध्ये कार्यरत आहेत, श्याम हे एक नामांकित पहिलवान आहेत. भारतीय सैन्य दलात कुस्ती क्षेत्रात त्यांच नावं आदराने घेतले जाते. ऑल इंडिया चॅम्पियनशिप मध्ये अनेक, सुवर्ण, रौप्य आणि काष्य पदकांना गवसणी घातली आहे. आता नितिन (श्याम) गायकर हे आर्टीलरी सेंटर नाशिक येथे कुस्ती प्रशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.