एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान;* *सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत* *मोहन वाघ*
*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान;*
*सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत*
*मोहन वाघ*”
*नाशिक, दिनांक: 14 डिसेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना 2022-23 अंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जावू नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाची योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने किंवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केल्यास वैयक्तिक शेततळ्याच्या आकारामानानुसार 50 टक्के व सामुहिक शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीकरिता जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे.
*योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे…*
▪️ फलोत्पादनाच्या नोंदीसह 7/12 उतारा व 8-अ
▪️ आधारकार्डची छायांकीत प्रत
▪️ आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची छायांकीत प्रत
▪️ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती संवर्ग प्रमाणपत्राची छायांकीत प्रत
▪️ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
▪️ हमीपत्र व स्थळपाहणी अहवाल