कृषीवार्ता

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा;* *खते व बी बियाणे उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे* *-कृषीमंत्री अब्दुल सत्तार*

 

*खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा;*
*खते व बी बियाणे उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे*
*-कृषीमंत्री अब्दुल सत्तार*

*नाशिक विभागातील खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा*

*नाशिक, दि 4 मे,2023, (विमाका वृत्तसेवा) :-*

आगामी खरीप हंगाम लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेत करावा. बी बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने सूक्ष्म नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक 2023 कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, कृषी संचालक (फलोत्पादन) कैलास मोते ,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे, कृषी संचालक (गुण नियंत्रण) विकास पाटील, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन ) सुभाष नागरे, कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांबळे, कृषी संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) रविंद्र भोसले, उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे, उपायुक्त (महसूल) संजय काटकर, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक पुणे रफिक नाईकवाडी, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री सत्तार म्हणाले की, खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत बैठका घेऊन पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. जिल्हानिहाय पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. कृषी विभागाने प्रत्येक गाव पातळीवर नियोजन करुन खते व बियाणे उपलब्धतेसंदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबतच बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी खते,कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी. बाहेरील राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेवून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही, श्री सत्तार यांनी यावेळी दिल्या.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेप्रमाणे कांदाचाळी बाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करावे. प्राधान्यक्रमाने पाणीपुरवठा होण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण विभागाने पाण्याबाबत योग्य ते नियोजन करावे.कृषी विभागाने जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहीत करावे. कृषि विभागातील 80 टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

कृषी आयुक्त श्री.चव्हाण म्हणाले, नाशिक विभागात खते, बियाणे तसेच निविष्ठांबाबत अडचण येणार नाही याची दक्षता कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. बोगस खते, बियाणे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे तपासणी करावी. शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, खरीप पीक कर्ज वाटपात नवं जुनं ही पध्दत न वापरता प्रत्यक्ष कर्ज वाटप करावे, जेणेकरुन अनधिकृत सावकारी व्यवसायाला आळा बसेल. तसेच बोगस बियाणे, खतांचे वाटप टाळण्यासाठी तालुकापातळीवरील समित्यांचे काम प्रभावीपणे करावे. ‘मिलेट’ मिशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावे. तसेच खरीप हंगाम यशस्वी करावा, असेही श्री गमे यांनी यावेळ सांगितले.

*नाशिक विभागाचे खरीप हंगाम नियोजन*

नाशिक विभागाचे खरीप हंगाम नियोजन
आगामी खरीप हंगामासाठी 26 लाख 87 हजार 36 हेक्टरनुसार कृषी विभागाचे पेरणीचे उद्दीष्टे आहे. नाशिक जिल्ह्यात 6 लाख 27 हजार 141 हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन आहे. तसेच अहमदनगर 6 लाख 49 हजार 730, जळगाव 7 लाख 56 हजार 600, धुळे 3 लाख 79 हजार 600 व नंदूरबार 2 लाख 73 हजार 965 हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे