गोदावरी नदी पात्रा जवळील गावान मधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे ..
दि. 14 ऑक्टोबर, 2022
*गोदावरी नदीपात्राजवळील गावांमध्ये सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे*
*: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे*
*गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या बैठक संपन्न*
*नाशिक दि. 14 ऑक्टोबर, 2022 (विमाका वृत्तसेवा):*
गोदावरी नदीपात्राजवळील सर्व गावांमध्ये सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती स्तरावर घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेची सहकार्य घेऊन लोकसहभागही घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या बैठकीत सांगितले.
गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., निरीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नितीन गोयल उपस्थित होते. समिती कक्षात महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपायुक्त (महसूल) रमेश काळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ,स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे, महानगरपालिकेच्या शिक्षणअधिकारी सुनीता धनगर, शिक्षण विभागाच्या सहायक संचालक पुष्पावती पाटील, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये सांडपाणी व व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी सीएसआरची मदत घेण्यात यावी. तसेच आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या इमारतींवर सांडपाणी व्यवस्थापन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली कार्यान्वित आहे किंवा नाही याच्या तपासणी करण्यात येऊन ज्या इमारतींवर सदर प्रणाली कार्यान्वित नसल्यास दंड आकारण्यात यावा, अशा सूचना श्री गमे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी श्री गमे यांनी यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आदी उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. गोदावरी प्रार्थना गीताचे प्रसारण व प्रसिध्दी करण्याचे यावेळी सांगितले.
गोदावरी नदीचे नागरिकांकडून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी चार पोलीस उपनिरीक्षक आणि तीस कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असून अद्याप सदर पथक पूर्ण वेळ कार्यरत दिसून येत नाही. त्यामुळे सिव्हिल अप्लिकेशन दाखल करुन सदर बाब मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा सूचना श्री गमे यांनी पोलीस विभागास यावेळी दिल्या.
*चंद्रशेखर पाटील यांच्या कामाची प्रशंसा*
उंटवाडी येथील नंदिनी पुलाजवळ नवरात्री च्या नंतरच्या काळात घटाचे निर्माल्य नदीत टाकणाऱ्या लोकांना शिट्टी वाजवून टाकू नका असे आवाहन चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे. जवळपास 5 ते 6 टन निर्माल्य नदीत जाण्यापासून त्यांनी रोखले असून नदी प्रदूषित होवू नये यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच नियमित श्री पाटील नदी प्रदूषित होऊ नये म्हणजे जनजागृती करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन येत्या 26 जानेवारीला श्री पाटील यांना महापालिकेच्यावतीने स्वच्छतादूत म्हणून गौरव करण्यात यावा, अशा सूचना श्री गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.