दिनांक: 12 जुलै, 2022
*महिलांच्या तक्रार निवारणात नाशिक सायबर सेलची कामगिरी उल्लेखनीय*
*: रूपाली चाकणकर*
*महिलांविषयक विविध उपक्रमांचा घेतला आढावा*
*नाशिक, दि.१२ जुलै, २०२२(जिमाका वृत्तसेवा):*
वाढत्या सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सायबर सेलच्या माध्यमातून महिला तक्रार निवारणासाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रार निवारण करण्यासाठी सायबर सेलची कामगिरी उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयात कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, बालविवाह व महिलांसंबंधी असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त (मुख्यालय) पोर्णिमा चौगुले, उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, उपायुक्त अमोल तांबे, उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना व इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, नाशिकच्या सायबर सेलने बाराशे तक्रारीपैकी 740 तक्रारी निकाली काढल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी किंवा फसवणूक होत असलेल्या महिलांनी 1093 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. निर्भया पथकाच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागासाठी 112 टोल फ्री क्रमांकाबरोबरच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने स्वत:चे चार टोल फ्री क्रमांक तयार करुन महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी चांगल्या प्रद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे, असे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
कौटुंबिक वाद, कौटुंबिक अत्याचाराच्या घटना मिटविण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन करुन भरोसासेल चांगल्या पद्धतीने सक्षम होते. त्यामुळे पोलीसाकडे येणाऱ्या तक्रारींचा निपटारा लवकर होण्यास मदत आहे. कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण वाढलेले होते. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने युद्धपातळीवर प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, संरपच यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले, असेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
निर्भया पथकाचे काम कौतुकास्पद
नोकरदार, महाविद्यालयीन युवतींच्या संरक्षणासाठी निर्भया पथक सक्षमतेने काम करत आहे. निर्भया पथकाने शाळा व महाविद्यालयीन वेळे व्यतिरिक्त शिकवणीवरून येणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी आपली कामगिरी बजावली आहे. निर्भयाचे चार पथके दोन सत्रात काम करतात. त्यामुळे महिला व मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत आहे, असेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस अंमलदार महिलांना चांगली कामगिरी केल्याबद्दल वीरकन्या म्हणून सरला खैरनार आणि ज्योती मेसट यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.