आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील घटना.
आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील घटना
अरुण हिंगमीरे
जातेगांव, नांदगाव
मनोरुग्ण व आजारी असलेल्या आपल्या पोटच्या मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याची घटना नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे उघड झाली आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ढेकू येथील रहिवाशी जनाबाई आप्पा पेंढारे यांनी आपला पोटचा मुलगा जनार्दन आप्पा पेंढारे हा मनोरुग्ण तसेच त्यास फिट येत असल्याने त्रास देत असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी समाधान दौलत भड कायमस्वरूपी रा. पळाशी ह.मु. ढेकू यास १५००० रुपयात सुपारी दिली, व त्यास दोन हजार रुपये इसार दिला. आणि उर्वरीत तेरा हजार रुपये काम देणे बाबत सांगितले.
वरील ठरलेले काम करण्याच्या उद्देशाने समाधान भड याने दि. ७ जुलै रोजी गुरुवारी १२.३० वाजेच्या सुमारास जनार्दन पेंढारे याच्याच घरातील लोखंडी लहान पहार घेऊन याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले व जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत निळ्या रंगाच्या प्लास्टिक च्या गोणीमध्ये टाकून गोणीचे तोंड शिवून येथील शेतकरी साईनाथ झब्बू राठोड यांचे शेतातील विहीरीत फेकून दिले.
आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्ताने माखलेले कपडे लपून ठेवले परंतू पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व उपाधिक्षक समिरसिंह साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे सब पोलीस निरीक्षक एस.एस. सुरवडकर, मनोज वाघमारे यांनी तपास चक्र फिरवत काही तासात आरोपीस जेरबंद करून भा.द.वी. ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नं २०१ २०२२ नुसार नोंद केली. वरील घटनेचा काही तासात उकल केल्याने नांदगाव पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
- अधिक पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सांगळे, श्रावण बोगीर, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, पो.शिपाई प्रदिप बागुल, पवार हे तपास करत आहे.