जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात निघाली बॉईज टाऊन परिवाराची वारी.
जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघाली |
बॉईज टाऊन परिवाराची वारी ||
विठ्ठलाचा नाममहिमा गात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गेल्या १3 वर्षांपासून बॉईज टाऊन शाळेत आषाढी एकादशीच्या दिवशी अतिशय भक्तिमय वातावरणात शाळेचे शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी म्हणजेच आपले छोटे वारकरी हातात टाळ , डोक्यावर टोपी आणि मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत पांडुरंगाला आर्त साद घालतात . यावर्षी दिनांक 4 जुलै ,2022 या दिवशी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांनी अतिशय उत्साहात या भक्तिमय सोहळ्यात भाग घेतला.
कुमारी मोक्षदा हिवाळे आणि मधुरा खालकर या विद्यार्थिनींनी विठ्ठलाच्या नामस्मरणाचा महिमा गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. श्री. ईश्वर काळे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘ जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी , ज्ञानोबा माऊली तुकाराम ’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण बॉईज टाऊन शाळेच्या क्रीडाङ्गणावर निर्माण केले . विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज घेऊनअभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली .
अशा या नयनरम्य आणि भक्तिमय कार्यक्रमाची सांगता वारकरी संप्रदायाच्या प्रार्थनेने करण्यात आली .या संपूर्ण कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ मॅडम यांचे. त्यांनी श्री. ईश्वर काळे सर व सहकारी शिक्षकांचे कौतुक करून उत्साह द्विगुणित केला.