अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा साठी मिळणार अनुदान. जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी.
4वृत्त क्र.C-298 दिनांक: 22 जुलै, 2022
*अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान;*
*इच्छुक शाळांनी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावेत*
*:जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी*
*नाशिक, दिनांक: 22 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
अल्पसंख्यांक विभागांतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 2022-2023 या वर्षाकरीता अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता इच्छुक शाळांनी 31जुलै 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे प्रस्ताव सादर करावेत, असे नाशिक जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार,या योजनेंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. या पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ही अनुदान योजना 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार आहे. अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी दिलेल्या मुदतीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.