मविप्रच्या उदाजी महाराज संग्रहालयाला मिळाला परकीय चलनांचा खजिना..!*
*मविप्रच्या उदाजी महाराज संग्रहालयाला मिळाला परकीय चलनांचा खजिना..!*
————————— 
*प्रा. डॉ. सुनिता पाठक यांनी भेट दिली विविध देशांची २७५ नाणी*
—————————
*नाशिक :जन्मत* आशिया खंडातील ‘चीनी यूआन’ ते ‘इंडोनेशियन रुपिया’ आणि युरोप खंडातील ‘युके पौंड स्टर्लिंग’ ते ‘फिनलंडचे युरो’ अशा प्रकारे २५ ते ३० विविध देशांमधील तब्बल २७५ प्रकारच्या चलनी नाण्यांचा खजिना नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयास प्राप्त झाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अध्यापन आणि संशोधन करत असताना जमविलेला हा अनमोल खजिना येथील प्राध्यापिका डॉ. सुनिता पाठक यांनी भेट देऊन वारसा संग्रहालयाच्या खजिन्यात मोलाची भर घातली आहे.
प्राध्यापिका असताना डॉ. सुनिता पाठक यांना आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये अध्यापन व संशोधनाचे कार्य करण्याची संधी मिळाली. या देशांमधील भेटी कायमस्वरूपी स्मरणात राहाव्यात, यासाठी तेथून त्या त्या देशांची नाणी सोबत घेऊन त्या परतत असत. अनेक वर्षांपासून जीवापाड जपलेला हा अनमोल खजिना नाशिकमधील शैक्षणिक संग्रहालयामध्ये ठेवल्यास त्यांचा वापर अधिक चांगल्या रितीने होईल. जेणेकरून भावी तरुण पिढीला परकीय चलनांची ओळख होईल, चलनांचा इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा निर्माण होईल, या उद्देशाने ही सर्वच्या सर्व २७५ नाणी डॉ. सुनिता पाठक यांनी मविप्रच्या उदाजी महाराज शैक्षणिक संग्रहालयास सुपूर्द केली आहेत.
मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संग्रहालयाचे शिक्षणाधिकारी प्रा. शशिकांत मोगल, आयएमआरटी महाविद्यालयाचे संचालक प्रशांत सूर्यवंशी, तसेच ए. के. पवार, डॉ. अनिल पाठक, संग्रहालयाच्या प्रशासक स्वाती वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्रा. शशिकांत मोगल यांच्या हस्ते डॉ. सुनीता पाठक यांचा स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
*…अशी आहेत नाणी*
ऑस्ट्रेलियन, हाँगकाँग, न्यूझीलंड, सिंगापूर, तैवान, अमेरिकन, कॅनेडियन, ब्रुनेई – डॉलर्स, चिनी – युआन, थाई- बाहत, मलेशियन- रिंग इट, फिलिपिन्स- पेसो, स्विस-फ्रँक, फ्रेंच- फ्रँक, इटालियन – लिरा, यूके – सेंट्स, व्हिएतनाम-डोंग, जर्मनी – मार्क, रिपब्लिक-कोरुना इंडोनेशियन- रुपिहा. आदी.
——————————–
*कोट*
उदाजी महाराजांच्या नावाने उभारलेले शैक्षणिक वारसा संग्रहालय हे शिक्षण क्षेत्राला वाहिलेले भारतातील पहिले संग्रहालय असून, त्यामध्ये जतन केलेला इतिहास सर्वांसाठी प्रेरक आहे. या संग्रहालयाला प्राध्यापिका डॉ. सुनिता पाठक यांनी दिलेली ‘भेट’ निश्चितच भावी पिढीसाठी प्रेरक ठरेल. ज्या भावनेतून त्यांनी ही ‘अनमोल भेट’ दिली, ती भावना आणि तो विश्वास नक्कीच जपला जाईल. नाशिककरांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी आणि इतिहास जाणून घ्यावा.
*- ॲड. नितीन ठाकरे,* सरचिटणीस, मविप्र, नाशिक.
——————————–
*नाशिक : मविप्र संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयासाठी शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल यांच्याकडे चलनी नाणी सुपूर्द करताना प्रा.डॉ. सुनीता पाठक व डॉ. अनिल पाठक. समवेत प्राचार्य प्रशांत सूर्यवंशी, ए. के. पवार, स्वाती वाडेकर.*
——————————–