शेतीत मजबूत मुल्यसाखळ्या उभ्या राहाव्यात केंद्रीय कृषि सचिव मनोज आहुजा यांची ‘सह्याद्री फार्म्स’ला भेट
शेतीत मजबूत मुल्यसाखळ्या उभ्या राहाव्यात
केंद्रीय कृषि सचिव मनोज आहुजा यांची ‘सह्याद्री फार्म्स’ला भेट
नाशिक (प्रतिनिधी) : शेतकरी उत्पादक कंपन्या देशातील शेतीचे चित्र बदलू शकतात. अशा मजबूत सक्षम मुल्यसाखळ्या उभ्या राहणे हीच काळाची गरज आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येत शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. असे प्रतिपादन केंद्रीय कृषि सचिव मनोज आहुजा यांनी केले. श्री. आहुजा यांनी मंगळवारी (ता. 27) मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकरी व शेती क्षेत्रातील स्टार्ट अप’ सुरु केलेल्या उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय कृषि सचिव (अतिरिक्त) अभिलाष लिखी, फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे आदी उपस्थित होते.
श्री. आहुजा म्हणाले की, बियाण्यापासून ते उत्पादन तंत्रज्ञान व बाजारापर्यंत शेतकरी एकत्र येताहेत. ‘सह्याद्री‘च्या माध्यमातून असे पूर्ण मुल्यसाखळीचे मॉडेल उभे राहिले आहे.
शेतीतील संपूर्ण मुल्यसाखळीचे ‘सह्याद्री’ मॉडेल देशभरातील शेतीत पसरले पाहिजे. शेतीतील प्रश्न खूप मोठे आहेत. मात्र ते सोडविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला तर खूप मोठी प्रगतीही साधली जाऊ शकते. ‘सह्याद्री’ हे आदर्श उदाहरण आहे. ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केवळ शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान तयार करणारे तंत्रज्ञ, तरुण उद्योजक यांचेही जाळे उभे राहिले आहे ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. देशभरातील शेतीत या बाबींचा समावेश होणे आवश्यक आहे.
केवळ शेतीतील ताजे उत्पादन विक्री करण्यापर्यंतच न थांबता त्याचे मुल्यवर्धन करण्यावर सह्याद्रीने व त्यांच्याशी जोडलेल्या स्टार्ट कंपन्यांनी भर दिला आहे. ही काळाची गरज आहे. या सगळ्यांशी आपल्या राष्ट्रीय संशोधन केंद्र, आयसीएआर या सारख्या शासनाच्या संस्थाही जोडलेल्या आहेत. या परस्परांत तंत्रज्ञानाचे सामंजस्य करार होताहेत. हेच शेतीचे भवितव्य आहे. अशा काळात शेतकरी उत्पादक कंपन्या खूप महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
यावेळी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सादरीकरणातून कंपनीचा प्रवास उलगडला. यावेळी श्री. आहुजा यांनी शेतकरी व कृषि उद्योजकांशी संवाद साधला. ‘सह्याद्री‘चे मॉडेल सर्व देशभरात प्रसारीत झाले पाहिजे. शेती विकासात कृषि स्टार्टअप मोलाची भूमिका बजावित आहेत. त्यांना गती देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी साह्य केले जाईल असेही त्यांनी सांगितला.
दरम्यान ‘सह्याद्री’भेटीच्या पहिल्या सत्रात आहुजा यांनी शेतकरी गणेश कदम यांच्या शेतास भेट देत शेतीत वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले. ‘सह्याद्री’ची अत्याधुनिक माती, पाणी, पानदेठ प्रयोगशाळा, कपडा उत्पादनाचा आरयू उद्योग, शेतकरी सुविधा केंद्र, आयात केलेल्या नव्या वाणांचे प्रक्षेत्र यांची पाहणी केली. सह्याद्रीच्या एफपीसी इन्क्युबेशन सेंटर मध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षणाची माहिती घेतली व प्रशिक्षणार्थी संचालकांचे अनुभव जाणून घेतले.
–