27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव* *खाद्य महोत्सवात विविध प्रांतातील खाद्यपदार्थांची चव एकाच छताखाली*
*27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव*
*खाद्य महोत्सवात विविध प्रांतातील खाद्यपदार्थांची चव एकाच छताखाली*
*केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसित प्रामाणिक यांनी घेतला कर्नाटकी गुळपोळीचा स्वाद*
*नाशिक, दि.13 जानेवारी, 2024 (नाशिक जनमत वृत्तसेवा)*
राष्ट्रीय युवा महोत्सवात आज दुस-या दिवशी विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाली. पंचवटीतील हनुमान नगरातील युवाग्राममध्ये आयोजित खाद्य महोत्सवाकडे नाशिककरांची पाऊले वळत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी एकाच छताखाली मिळत असल्याने खाद्य महोत्सव हा या महोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मोह केंद्रीय राज्यमंत्री निसित प्रामाणिक यांनाही झाला व त्यांनी यावेळी कर्नाटकी गुळपोळीचा आस्वाद घेतला.
*खाद्य महोत्सवात घ्या या पदार्थांचा आस्वाद*
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त हनुमान नगर परिसरात खाद्य महोत्सव भरवला आहे. महोत्सवात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात यांसह वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील केळी वेफर्स, वडापाव, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ यासह चमचमीत, तर्रीदार कोल्हापुरी उसळसह दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदुवडा, कर्नाटकी गुळपोळी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ नाशिककरांना आकर्षित करत आहेत. पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने देशपातळीवर तृणधान्यविषयक पाककला स्पर्धेतील विजेत्यांच्या पाककृती, पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.