रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न एस एस के पब्लिक स्कूल विजेते.
रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न
एस एस के पब्लिक स्कूल विजेते
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए व श्रीरंग सारडा यांच्या रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एस एस के पब्लिक स्कूलने पटकावले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर अंतिम सामन्यात एकतर्फी लढतीत एस एस के पब्लिक स्कूलने ,दिल्ली पब्लिक स्कूलवर ११० धावांनी मोठा विजय मिळवला.
अंतिम सामन्यानंतर लगेचच , नाशिक जिल्हा परिषद मुख्याधिकारी ( सी ई ओ ) – अस्मिता मित्तल व क्रीडा व युवक सेवा केंद्राचे उपसंचालक – रविंद्र नाईक या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितित या १८ व्या रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ झाला. या प्रसंगी रासबिहारी इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिका बिंदु विजयकुमार , व्यवस्थापिका परमजीत कौर, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे , सहभागी खेळाडू, प्रशिक्षक व पालक उपस्थित होते.
२००३ पासून सुरू झालेल्या व अतिशय यशस्वीरीत्या सातत्यपूर्ण नियोजन झालेले या स्पर्धेचे हे सलग १८ वे वर्ष आहे . रासबिहारीचे विश्वस्त श्रीरंग सारडा व नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा यांच्या शालेय वयातच क्रिकेटपटूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या संकल्पनेतून या स्पर्धेचा जन्म झाला.
साखळी स्पर्धेचे चार गटातील १६ संघांतील एकूण २४ सामने पार पडल्यानंतर उपांत्य फेरीचे २ व अंतिम फेरी असे एकूण २७ सामने झाले. अंतिम सामन्याचा सामनावीर एस एस के पब्लिक स्कूलच्या आर्यन घोडकेने आपल्या अष्टपैलू खेळाने – ५ सामन्यात १४ बळी व ४ डावात १२९ धावा – मालिकावीर म्हणून पुरस्कार मिळविला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सेंट लॉरेन्स हाय स्कूलचा चिन्मय भास्कर ( ३ डावात २३२ धावा ) तर सेंट लॉरेन्स हायस्कूलच्याच आयुष शहाणेने ( ३ सामन्यात १२ बळी ) उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. फ्रावशी अकादमी चा वेदांत ठक्कर ठरला उत्कृष्ट यष्टिरक्षक ( ३ सामन्यात ६ बळी ) तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी झाला रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल शिव पवन.
अंतिम फेरीचा संक्षिप्त धावफलक : एस एस के पब्लिक स्कूल- २५ षटकांत ४ बाद २०५ – ज्ञानदीप गवळी ६३, स्वराज ए – ६२,तन्मय जगताप नाबाद २६, सक्षम देशमाने २ बळी वि दिल्ली पब्लिक स्कूल -२५ षटकांत ८ बाद ९५ – रोहन शिरभाते २५ ,आर्यन घोडके ४ बळी.
: एस एस के पब्लिक स्कूल चा विजेता संघ , प्रशिक्षक भाविक मंकोडी, संचालक कुणाल कातकाडे , प्रमुख पाहुणे नाशिक जिल्हा परिषद मुख्याधिकारी ( सी ई ओ ) – अस्मिता मित्तल व क्रीडा व युवक सेवा केंद्राचे उपसंचालक – रविंद्र नाईक व रासबिहारी इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिका बिंदु विजयकुमार , व्यवस्थापिका परमजीत कौर, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे व रासबिहारीच्या प्रशिक्षक भावना गवळी यांचेसह इतर समन्वयक.हजर होते.