मांजरगाव येथे उद्यापासून भव्य रौप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार सेवा देणार
मांजरगाव येथे उद्यापासून भव्य रौप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह
राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार सेवा देणार
नाशिक:-प्रतिनिधी
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सववर्षा निमित्त निफाड तालुक्यातील मांजरगाव येथे रौप्यमहोत्सवी हरिनाम सप्ताह उद्या शुक्रवार (दि.०३ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. २५ वर्षाप्रमाणेच यंदाही राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार या सप्ताहात आपली सेवा देणार आहे.
गावातील मारुती मंदिरात होणाऱ्या या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ते १० ज्ञानेश्वरी पारायण , सकाळी १० ते ११ संत निवृत्ती नाथ महाराज अभंग गाथा भजन , साय.४.३० ते ६ संत निवृत्तीनाथ महाराज चरित्र कथा, साय. ६ ते ७ हरिपाठ , साय. ७ ते ९ हरी कीर्तन , दररोज रात्री ९ ते ११ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि. ३) प्रसिद्ध कथाकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, ( परळी वैद्यनाथ, ह. मु. नाशिक) , अशोक महाराज इलग शास्त्री, बोधेगांव (दि. ४), विशाल महाराज खोले, मुक्ताईनगर (दि. ५ ), उमेश महाराज दशरथे, परभणी (दि. ६), जगन्नाथ पाटील मगर (वानप्रस्थ उपासना क्षेत्र, सरळांबे, मुंबई) ( दि. ७), ज्ञानेश्वर माऊली कदम, आळंदी (दि.०८), निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ( दि.९) तर शुक्रवार दि.१० नोव्हेंबर रोजी भगीरथ महाराज काळे यांचे सकाळी ९ वाजेला काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे या सप्ताहाचा समारोप होणार आहे. सप्ताहात दररोज एकनाथ महाराज गोळेसर (कुंदेवाडी) साय.४.३० ते ६ यावेळेत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे चरित्र विविध पैलूने उलगडणार आहे. सप्ताहात ग्रामस्थ व सर्वांच्या सहकार्याने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पांडुरंग सोनवणे, राधाकिसन हाडपे, पंडित सोनवणे, लक्ष्मण सोनवणे,दगू नागरे, रामनाथ सोनवणे, सोमनाथ चिंधू सोनवणे,किसनराव सोनवणे,एकनाथ नागरे, सुभाष सोनवणे, संदीप सानप, विठोबा बोंद्रे,बबन बिडवे, रामचंद्र राऊतसर, सागर महाराज दौंड आदींसह मांजरगाव समस्त ग्रामस्थानीं केले आहेत.
प्रसिद्ध वादक , गायकांचाही राहणार सहभाग
सप्ताहात राज्यभरातील प्रसिद्ध किर्तनकार यांच्याबरोबरच तेवढ्याच उंचीचे वादक , गायक देखील आपली सेवा देणार आहे. त्यात मृदुंगाचार्य दिनेश महाराज मोजाड, तर गायनाचार्य म्हणून कुंदन महारज बोरसे, कोमल महाराज गुर्जर, चिंतामण महाराज सानप, राहुल महाराज डूंबरे यांचा समावेश आहे.