शेतकऱ्यांनी भरड धान्य नोंदणी करावी* राजेंद्र इंगळे*
*शेतकऱ्यांनी भरड धान्य नोंदणी करावी*
*:राजेंद्र इंगळे*
*नाशिक, दिनांक 28 ऑक्टोबर, 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):
खरीप पणन हंगाम 2023-24 साठी केंद्र शासनाने निश्चित केलल्या हमीभावानुसार राज्यात भरडधान्य (मका, ज्वारी व बाजरी) खरेदी करण्यासाठी NEML पोर्टलवर 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत नोंदणी प्रक्रीया राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर भरड धान्य नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, नाशिक राजेंद्र इंगळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांना भरडधान्य नोंदणीसाठी पणन हंगाम 2023-24 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असल्याची 7/12 उताऱ्याची मूळ प्रत, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते पासबुकाच्या प्रथम पानाची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे जॉईंट खाते असल्यास फक्त प्रथम खातेदार व्यक्तीनेच नोंदणी करावी, जॉईंट खात्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीने नोंदणी करीता खाते तपशिल दिल्यास PFMS पोर्टलवरून पेमेंट खात्यावर वितरीत होणार नाही याची नोंद घ्यावी. शेतकरी खातेदाराचे जनधन बॅँकेत खाते नसावे. खातेधारक शेतकऱ्यांनी आपल्या मोाबईल क्रमांकाच्या तपशिलाची नोंदणी तालुक्याच्या सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या ठिकाणी करावी. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना खरेदीसाठी माल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्या शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी भरडधान्याची विहित मुदतीत नोंदणी करावी. नोंदणी व खरेदीबाबतच्या अधिक माहितीसाठी आपआपल्या तालुक्यातील संबंधित सहकारी खरेदी विक्री संस्थेशी संपर्क साधावा, असेही जिल्हा पणन अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.