नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात* *बंद्यांनी साकारलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू*

*नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात*
*बंद्यांनी साकारलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू*
*नाशिक, दिनांक: 8 सप्टेंबर, 2023 ( वृत्त):*
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंद्यांनी शाडूमातीपासून पर्यावरणपूरक साकारलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून पर्यावरणपूरक मुर्ती खरेदी करण्याचे आवाहन नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अरूणा मुगूटवार यांनी केले आहे.
गणेशमुर्ती प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरिक्षक मध्य विभाग, छत्रपती संभाजी नगर, (औरंगाबाद) यु. टी. पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी समारंभास नाशिकरोड मध्यवर्ती करागृह अधीक्षक अरूणा मुगूटवार, सहायक पोलीस उपायुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास वाळुंजे, विजय पगारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कारागृह उपमहानिरिक्षक मध्य विभाग, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यु. टी. पवार आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, ‘सुधारणा व पुर्नवसन’ या कारागृहाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे कारागृहातील बंद्यांच्या कालागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विविध प्रकारच्या उपयुक्त व टिकावू वस्तूंचे उत्पादन कारागृह उद्योगातुन करण्यात येते. पैठणी व गणेशमुर्ती यांच्या उत्पादनासाठी नाशिकरोड कारागृह प्रसिद्ध आहे. गणेश मुर्तींची वाढती मागणी पाहता कामाचे तास वाढवून मोठ्या प्रमाणात गणेश मुर्ती तयार करण्याबाबत श्री. पवार यांनी यावेळी सूचित केले. उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांनी गणेश मुर्ती प्रदर्शनाची पाहणी करून बंद्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कारागृहातील बंद्यांकरिता विविध शैक्षणिक उपक्रम राबविणारे शिक्षक हेमंत पोतदार व बालाजी म्हेत्रे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
सदर प्रदर्शनात शुभ्र कमल, बालगणेश, लालबाग, दगडूशेठ अशा विविध प्रकारच्या मुर्ती विक्री करीता ठेवण्यात आल्या आहेत. असेही कारागृह अधीक्षक अरूणा मुगूटवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.