१९ वर्षांखालील) हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी संपन्न नासिक क्रिकेट अकादमी विजेते

(१९ वर्षांखालील) हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी संपन्न
नासिक क्रिकेट अकादमी विजेते
नाशिक जनमत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी च्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमीने मेरी क्रिकेट क्लबवर ६ गडी राखून मात करत पटकवले. विजयाचे प्रमुख मानकरी ठरले ते ४ बळी घेणारा नासिक क्रिकेट अकादमीचा डावखुरा मंदगती गोलंदाज विवेक यादव व ३ बळी घेणारा लेग स्पिनर सिद्धांत मुथा तसेच ७१ धावा फटकावणारा साहिल पारख.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मेरी क्रिकेट क्लबला ४३.१ षटकांत १२३ धावांवर सर्वबाद करण्यात नासिक क्रिकेट अकादमीच्या गोलंदाजांनी यश मिळवले. पुष्कर अहिररावने २५, नकुल सागरने २३ व आर्यन पवारने २० धावा केल्या. डावखुरा मंदगती गोलंदाज विवेक यादवने ४ , सिद्धांत मुथाने ३, शयान खानने २ व साहिल पारखने १ गडी बाद केला. विजयासाठीच्या १२४ धावा डावखुरा सलामीवीर साहिल पारखच्या तडाखेबंद ७१ धावांच्या जोरावर एन सी ए ने १८.३ षटकांतच ६ गडी राखून पार केल्या. आर्यन पालकरने नाबाद २० धावा केल्या .निसर्ग चौधरीने २ तर नकुल सागर व हार्दिक भटने प्रत्येकी १ गडी बाद केला . या हंगामातही १९ वर्षांखालील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – ने आपल्याकडेच राखले .