ब्रेकिंग

थॅलेसेमियाच्या उपचारासाठी १० लाखांची मदत;* *मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील 10 रुग्णालयांत सुविधा उपलब्ध* *: डॉ. भारती पवार*

*थॅलेसेमियाच्या उपचारासाठी १० लाखांची मदत;*
*मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील 10 रुग्णालयांत सुविधा उपलब्ध*
*: डॉ. भारती पवार*

*नाशिक, दिनांक 11 मे, 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा) :*
थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधीत अनुवांशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

या उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह भारतातील दहा नामांकित रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत 2017 पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना (TBSY – टीबीएसवाय) राबवली जात आहे. नुकताच मार्च, 2023 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. कोल इंडियाच्या वतीने, त्यांच्या सीएसआर उपक्रमा अंतर्गतच्या वित्तीय सहकार्याच्या माध्यमातून हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT) हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे, असे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना, ज्यांच्याकडे वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्यारोपणासाठी जुळणारे दाते आहेत, परंतु या प्रक्रियेचा खर्च भागविण्यासाठीची आर्थिक क्षमता अथवा स्रोत नाही, अशा रुग्णांना या आजारातून मुक्त होण्यासाठी एकदाच करायच्या उपचारांची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंतच्या दोन टप्प्यांमध्ये देशभरातील 10 सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये, थॅलेसेमिया रूग्णांवरच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची (bone marrow transplants) 356 प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहेत. तसेच ‘थॅलेसेमिया आणि सिकलसेल सारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी या आजाराशी संबंधीत तपासण्या आणि चाचण्या वाढवणे, या आजारा संबंधी अधिकाधिक जनजागृती करणे, समुपदेशनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि उपचारांच्या सोयी सुविधा वाढविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रक्ताशी संबंधित विकारांविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी समाजातल्या विविध भागधारकांनी पुढाकार घेवून सहकार्य आणि मदतीचा हात पुढे करायला हवा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या औचित्याने आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या (टीबीएसवाय) तिसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत कोल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. तसेच थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गतच्या या तिसऱ्या टप्प्यात प्रति रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपणासाठी (Hematopoiesis stem cell treatment) 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत कोल इंडिया लिमीटेडकरून रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपण करणाऱ्या संस्थांना थेट हस्तांतरित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रूग्ण आणि वाढ खुंटवणाऱ्या अशक्तपणाने (Aplastic Anemia) ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होणार असल्याने गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे