लोकशाही बळकट करण्यासाठी सेवाभाव महत्वाचा. डॉक्टर भारती पवार.
¤: 02 ऑक्टोबर, 2022
*लोकशाही बळकट करण्यासाठी सेवाभाव महत्वाचा;*
*आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार*
*- डॉ. भारती पवार*
*नाशिक, दिनांक 02 ऑक्टोबर, 2022
सेवा भावनेतून नागरिकांची कामे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. याच सेवाभावनेतून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडल्यास लोकशाही अधिक बळकट होईल. तसेच जिल्ह्याचा विकास साधताना आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सिकलसेल आजार निदान व उपचार शिबीर तसेच दिव्यांगाना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या थोरपुरुषांच्या समर्पणातून प्रेरणा घेवून आपण स्वातंत्र्य भारताची प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहोत. थोरपुरूषांच्या विचारातून आपल्याला मिळालेली सेवाभाव वृत्ती येणाऱ्या पिढीमध्ये रूजविण्यासाठी सेवा पंधवडा देशभरात राबविण्यात आला. विद्यार्थीदशेतच मुलांनी थोरपुरूषांचे आत्मचरित्र वाचणे गरजेचे आहे. देशाचा विकास करीत असतांना शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत असणे देखील महत्वाचे असल्याने तरूण पिढीने शरीरास हानीकारक अशा व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवणे महत्वाचे आहे. तारूण्यात गंमत म्हणून केलेले हानीकारक पदार्थांचे सेवन कधी व्यसनात रुपांतरीत होते, हे लक्षात येत नाही. त्यातून कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते, त्यामुळे कुटुंबाला देखील मोठ्या प्रमाणात गंभीर परिणामाना सामोरे जावे लागते. अशावेळी तरूण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे हे सजग व जागृत नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार होणे गजरेचे आहेत. या आजाराबाबत जनजागृती करून पुढच्या पिढीत हा आजार जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच कुपोषणाबाबत सर्वच आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्या मदतीने ग्रामीण भागातील प्रत्येक गरोदर मातेची तपासणी करण्यात येवून त्यांना मुल गर्भात असतांनाच पोषक आहार देण्यावर भर देण्यात आहे. तसेच कोविड काळातही आरोग्य यंत्रणेने हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर केलेले लसीकरणाचे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यावी. तसेच दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक सुविधा व मदत उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत. यासोबतच सेवा पंधरवडा व स्वच्छता अभियान राबवितांना कार्यालयीन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे गरजेचे आहे, ज्यामुळे नागरिकांची सेवा केल्याचे समाधान मिळून खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविल्याचा आनंद आपणास प्राप्त होईल. तसेच सर्वच आघाडीवर आपण प्रगती करतांना आपण निसर्गाच देणं लागतो ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ही डॉ. पवार यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येवून प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांग बांधवांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्रवणयंत्रांचे व कुबड्यांचे डॉ. पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच सिकलसेल बाबत रक्त तपासणीसाठी नियोजन भवनात आरोग्य विभागामार्फत स्टॉल देखील लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे यावेळी तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले.