केंद्राच्या योजना मध्ये राज्याच्या मोठा वाटा. राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहोचल्या.
*केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा;*
*राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या*
*: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
*नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीतून साधला संवाद*
*पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे*
*नाशिक: दिनांक ३१ मे २०२२ (जिमाका वृत्त)*
योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणांचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सह्याद्री अतिथीगृहातून येथील कालीदास कलामंदिरात संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मुंबईतून पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी तसेच नाशिक च्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, निलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या 13 विविध कल्याणकारी योजनांचे नोडल अधिकारी,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या औचित्याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार यांच्याशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यावेळी संवाद साधला.
*योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग*
केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.
*महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक*
प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.
याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.
*व्याज परतावा सुरू करा*
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.
*अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही*
केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
*यांच्याशी साधला संवाद*
▪️मीराबाई भुरसिंह पवार, पिंपळगाव ता. बागलाण
▪️नामदेव रामभाऊ मेधने, सटवाईवाडी ता. देवळा
▪️आनंदा शंकर पाटील, कावणे ता. इगतपूरी
*लाभार्थी काय म्हणाले…*
पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आधाराने माझ्या कुंटुबांचा प्रवास कच्च्या घरापासून ते पक्क्या घरापर्यंत पूर्ण झाला आहे. माझं पहिले मातीचे घर असल्याने पावसाळ्यात मोलमजुरी करुन आल्यानंतर घरातील सर्व काही आवरावं लागायचा.तेव्हा मनाला खूप वेदना व्हायच्या. पंरतु आता कितीही मोलमजुरी करुन जीव थकला असला तरी आवास योजनेच्यामाध्यमातून तयार झालेल्या पक्क्या घरात येतांना खूप समाधान वाटते. आज मी केंद्र व राज्य शासनाच्या 8 योजनांचा लाभ घेतला आहे. शासनाच्या योजंनामुळे माझे घर आज आनंदी आहे. त्यामुळे शासन व योजना आमच्यापर्यंत पोहचविणाऱ्या यंत्रणेचे मनापासून आभारी आहे.
*मीराबाई पवार,पिंपळदर, ता.बागलाण*
*आठ योजनांच्या लाभामुळे जीवन सुरळीत*
केंद्र व राज्य शासनाच्या एकूण 8 योजनांचा लाभ मी घेतला आहे. यामध्ये घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर, त्यामध्ये वीज जोडणी, जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ जोडणी, उज्वला योजनेतून गॅस, स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शौचालय अशा आठ योजनांचा लाभ घेतल्याने माझे जीवनमान उंचावले असून जीवन सुरळीत सुरु झाले आहे. तसेच माझ्या घराच्या छतावरुन पडणारे पाणी शौच खड्यात पडेल अशापद्धतीने नियोजन केले आहे. घराच्या परिसरात परस बागही विकसित केली आहे. *आनंद शंकर पाटील, कावणे, ता.इगतपुरी*
*घरकुलाने केले स्वप्न पूर्ण*
महाआवास योजनेच्या माध्यमातून मला घरकूल मंजूर झाले. मंजूर झालेले घरकूल आज पूर्णही झाले असून माझे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाल्याने मला खूप समाधान वाटते आहे. घराबरोबर पाण्याचीही सुविधा शासनाने मला जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. या सर्व सुखसुविधा मला शासनामुळे मिळाल्या आहेत. त्यामुळे शासनाचा मी खूप खूप आभारी आहे.
0000000000